Monday, July 1, 2024

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्कर ‘इंप्रेस’, ट्वीट करत म्हणाली, ‘स्वीट!’

राजकारण आणि सिनेसृष्टीचा फार जुना संबंध आहेे. या दोन्ही क्षेत्रातील मंडळी एकमेंकावर केलेल्या कमेंटमुळे चांगलेच चर्चेत येत असतात. काहीजण टीका करतात, तर काहीजण मजामस्करीही करतात, त्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधले जाते. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी (१७ फेब्रुवारी) पुद्दुचेरी दौऱ्यावर गेले होते. एप्रिल- मे महिन्यात तिथे विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यासाठी ते पक्षाच्या प्रचारासाठी तिथे पोहोचले होते. इथे त्यांनी विद्यार्थ्यांनाही संबोधित केले. यादरम्यान विद्यार्थ्यांने ‘सर’ म्हटल्यानंतर गांधींनी मजेशीर अंदाजात त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करलाही आवडला आणि तिनेही मजेशीर ट्वीट केले.

राहुल गांधींनी म्हटले की, “माझे नाव सर नाहीये. माझे नाव राहुल आहे, त्यामुळे मला राहुल नावाने हाक मारा. तुम्ही आपल्या मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांनाच सर म्हणा, मला फक्त राहुल म्हणा.” त्यांचे हे वक्तव्य ऐकून विद्यार्थी उत्साहित झाले. यावर विद्यार्थ्यांनी विचारले की, ‘आम्ही तुम्हाला राहुल अन्ना (भाऊ) म्हणून बोलवू शकतो का?’ यावर राहुल गांधींनीही होकार दिला.

त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्वीट केला आहे. तिने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्वीट!” तिच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

तसं पाहिलं, तर राहुल गांधी अनेकवेळा मजेशीरपणे असे करताना दिसले आहेत. जेव्हाही ते कोणत्या कॉलेजमध्ये संबोधित करण्यासाठी जातात, तेव्हा ते ‘सर’ म्हणवून घेण्यास नकार देतात. असेच काहीसे त्यांनी चेन्नईच्या स्टेला मेरिट कॉलेजमध्ये केले होते.

राहुल गांधींनी पुद्दुचेरी दौऱ्यादरम्यान मच्छीमारांची भेट घेतली. मच्छीमारांची प्रशंसा करताना त्यांनी ‘समुद्राचा शेतकरी’ म्हटले. पुढे बोलताना म्हटले की, काम करताना कितीतरी संकटे येतात, हे समजण्यासाठी त्यांना स्वत: ला त्यांच्यासोबत समुद्रामध्ये जायचे आहे.

पुद्दुचेरीमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. पक्षाच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्याने, कमी वेळात पक्षाला बळकट करण्याचे आव्हान राहुल गांधींसमोर आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुमच्या पिक्चरचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही’, ‘या’ कारणामुळे काँग्रेस नेत्याने साधला बिग बी आणि अक्षय कुमारवर निशाना

-संदीप नाहर आत्महत्या प्रकरणी बायको आणि सासू जाणार तुरुंगात? पाहा कुणी दाखल केलीय केस

हे देखील वाचा