Tuesday, July 9, 2024

लढवय्या अभिनेत्री! महिमा, सोनालीसह या तारकांनी दिली कॅन्सरला मात

युवराज सिंगची कॅन्सरला मात देऊन कमबॅक करण्याची स्टोरी जवळपास सर्वांनाच माहिती आहे… याबद्दल युवराजचे कौतुकही होत असते. पण तुम्हाला माहित आहे का की काही अभिनेत्रीही आशा आहेत, ज्यांनी कॅन्सरसारख्या आजाराला हरवलं आहे. हा विषय निघण्याचे कारण म्हणजे, नुकतेच परदेश, धडकन फेम महिमा चौधरी हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून ती या आजाराला धैर्याने मात देत असल्याचे समोर आले. पण महिमा चौधरी ही काही पहिली अभिनेत्री नाही जी कॅन्सरशी लढा देत आहे. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी आपल्या कॅन्सरशी दिलेल्या लढाईतून अनेकांना प्रेरणा दिली आहे… शेवटी ते म्हणतात ना की जिथे जिद्द आणि विश्वास आहे, तिथे मार्ग नक्की मिळतो. तसंच या अभिनेत्रींनी मोठ्या धैर्याने कॅन्सरला पराभूत केलंय कोण आहेत या अभिनेत्री हे जाणून घेऊयात…

महिमा चौधरीच्या आधी काहीदिवसांपूर्वीच अभिनेत्री छवी मित्तल हिलाही ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याचे समोर आले होते. तिनेही कधी याबद्दल लपवून ठेवले नाही. या कॅन्सरमधून बाहेर पडण्यासाठी तिला सर्जरी देखील करावी लागली. तसेच यातून ती आता बरी होत आहे. या लढाईत तिला तिच्या कुटुंबाने फार आधार दिल्याचे तिने सांगितले.

महिमा आणि छवीपूर्वी ताहीरा कश्यप, बार्बरा मोरी, हमसा नंदीनी, मुमताज या अभिनेत्रींनीही ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई दिली. फिल्ममेकर आणि लेखिका असलेल्या ताहीराने तर तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यापासून त्याबाबत उघडपणे चर्चा केली. तिने याबाबतीत जागरुकताही पसरवण्याचा प्रयत्न केला. तिने या लढाईतील अनेक महत्त्वाच्या घटना सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. यादरम्यान, तिला तिचा पती अभिनेता आयुषमान खुराना आणि कुटुंबातील अन्य सदस्यांकडूनही खूप मदत मिळाली. ती २०१९ मध्ये कॅन्सरमधून पूर्ण बरी झाली. तेलगू अभिनेत्री हमसा नंदीनी हिलाही ग्रेड ३ च्या ब्रेस्ट कॅन्सरशी लागण झाल्याचे समोर आले होते. तिनेही केमोथेरपीद्वारी या आजाराशी लढाई दिली. केवळ या युवा अभिनेत्रींनीच नाही, तर ६०-७० आणि ८० च्या दशकात अभिनय क्षेत्र गाजलेल्या मुमताज यांनीही ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई केली आहे. त्यांना २००२ साली पन्नाशी ओलांडली असताना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. पण अशा परिस्थितही त्यांनी हार न मानता कॅन्सरला हरवलं. आज त्या कॅन्सरला हरवल्यानंतरही आनंदाने आयुष्य व्यतीत करत आहेत. काईट चित्रपटामुळे अनेकांना माहित झालेली अभिनेत्री बार्बरा मोरी हिनेही ब्रेस्ट कॅन्सरला हरवलंय. तिला करियरच्या सुरूवातीलाच कॅन्सर झाल्याचे समजले होते, पण तिने माघार न घेता त्यावर मात केली आणि करियरही केले.

बरं अभिनेत्रींनी फक्त ब्रेस्ट कॅन्सरवरच मात केली असं नाही, तर ब्लड कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर यासांरख्या कॅन्सरच्या प्रकरांनासुद्धा हरवल्याची उदाहरणे आहेत. दिग्गज किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे २०२१ मध्ये त्यांचे पती अनुपम खेर यांनी सांगितले होते. त्यांना मल्टीपल मायलोमा प्रकाराचा ब्लड कॅन्सर असल्याचे समोर आले होते. विशेष गोष्ट अशी की उपचार सुरू असतानाही त्यांनी आपले काम सुरू ठेवत सर्वांना प्रेरणा दिली होती. इतकेच नाही, तर कॅन्सरबाबत अभिनय क्षेत्रात सर्वात आधी खुलेपणाने बोलणाऱ्यांपैकी अभिनेत्री लिसा रे ठरली होती. इंडियन-कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या लिसा हिलाही ब्लड कॅन्सर झाला होता. २००९ मध्ये तिच्या कॅन्सरवर उपाचार करण्यासाठी स्टेम सेल ट्रान्सप्लांट करण्यात आले. तसेच तिने त्याआधी अनेक केमोथेरपी केल्या होत्या. अखेर ती या आजारातून बरी झाली. बरी झाल्यानंतरही तिने कॅन्सरबद्दल जागृती करण्यावर भर दिला, तसेच तिचे तिच्या पुस्करातही कॅन्सरच्या लढाईबद्दल सांगितले आहे.

सोनाली ब्रेंद्रे अनेकांना माहिती असेलच, पण ती देखील कॅन्सर सरवायवर आहे. तिला मेटास्टाटीक कॅन्सरचे २०१८ साली निदान झाले होते. तिने या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार केले. यादरम्यान तिने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. तसेच तिच्या या पोस्टमधून तिने अनेकांना प्रेरणा दिली होती. तिने या उपचारादरम्यान हार न मानता लढाई दिली. लाईफ इन अ मेट्रो चित्रपट लक्षात असेल, तर धरमेंद्र यांच्यासोबत दिलेली आजीही लक्षात असेल. ती आजी म्हणजेच अभिनेत्री नफिसा अली. यांनी देखील पेरिटोनिल आणि ओव्हरियन कॅन्सर झाल्याचे २०१८ साली समजले होते. त्यांनी त्यावर उपचार करताना अनेक केमोथेरपी केल्या. अनेकदा त्यांनी याबद्दल सोशल मीडियावरही अपडेट दिल्या होत्या. नव्वदच्या दशकात गाजलेली अभिनेत्री म्हणजे मनिषा कोईराला. तिनेही कॅन्सरला हरवले होते. तिला २०१२ साली ओव्हरियन कॅन्सर झाला होता. तिने अमेरिकेला जाऊन यावर उपचार घेतले. तिच्या लढाईनेही पुढे अनेकांना प्रेरणा दिली होती.

तर मित्रांनो विश्वास ठेवला आणि योग्य उपचार घेतले, तर कॅन्सरसारख्या आजारांनाही मात देता येऊ शकते, हेच या अभिनेत्रींनी दाखवून दिलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हेही सांगा. त्याचबरोबर दैनिक बोंबाबोंबला शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका.

इथे पाहा व्हिडिओ: महिमासोबतच ‘या’ अभिनेत्रींनीही दिलीये कॅन्सरशी झुंज | Bollywood Actresses Who Battled Cancer

हे देखील वाचा