Tuesday, July 9, 2024

वयाच्या ५०व्या वर्षी अभिनेता बनले होते ए.के.हंगल, ‘या’ कारणामुळे भोगावा लागला पाकिस्तानचा तुरुंगवास

तुम्ही सर्वांनी ‘शोले’ हा बॉलिवूड चित्रपट अनेकदा पाहिला असेल आणि या चित्रपटातील प्रत्येक पात्रही तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटातील असेच एक प्रसिद्ध पात्र म्हणजे रहीम चाचा. आम्ही बोलत आहोत अभिनेता ए.के. हंगल (A.K Hangal) यांच्याबद्दल. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या, परंतु प्रत्येक वेळी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या हंगल यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१४ रोजी सियालकोट (आता पाकिस्तान) येथे झाला. मंगळवारी (१ फेब्रुवारी) त्यांची जयंती आहे. अशा परिस्थितीत आज त्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया…

स्वातंत्र्य चळवळीत सामील होते हंगल
फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ए.के. हंगल हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात सामील होते. वडिलांच्या निवृत्तीनंतर हंगल यांचे संपूर्ण कुटुंब पेशावरहून कराचीला आले. जवळपास तीन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात घालवल्यानंतर हंगल १९४९ मध्ये मुंबईत परतले. ए.के. हंगल यांचे पूर्ण नाव अवतार किशन हंगल होते. हंगल हे मूळचे काश्मिरी पंडित होते, त्यांनी त्यांचे बालपण पेशावरमध्ये घालवले. ते आयपीटीए या समूहाशी संबंधित होते, ज्यात त्यांच्यासोबत बलराज साहनी आणि कैफी आझमीही होते. (bollywood ak hangal 105th birth anniversary today)

चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ए.के. हंगल यांनी १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बासू भट्टाचार्य यांच्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. ७० ते ९०च्या दशकापर्यंत, हंगल यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या वडिलांची किंवा जवळच्या नातेवाईकाची भूमिका साकारली. त्याच्या काही निवडक चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यात ‘नमक हराम’, ‘शौकीन’, ‘शोले’, ‘अवतार’, ‘अर्जुन’, ‘आँधी’, ‘तपस्या’, ‘कोरा कागज’, ‘बॅचलर’, ‘छूपा’, ‘रुस्तम’, ‘चितचोर’, ‘बालिका वधू’, ‘गुड्डी’ या चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हंगल यांना २००६ साली भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

बहुतेक आयुष्य घालवले एकटे
बॉलिवूड अभिनेते ए.के. हंगल यांनी आपले बहुतेक आयुष्य एकटे घालवले. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांना खूप एकटे वाटू लागले. त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा राहत होता. आयुष्याच्या अखेरीस त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले, असे म्हणतात. जेव्हा मुलाकडे त्यांच्या उपचारासाठी जास्त पैसे नव्हते, तेव्हा अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडच्या अनेक लोकांनी त्यांना आर्थिक मदत केली. २०१२ मध्ये वयाच्या ९८व्या वर्षी ए.के. हंगल यांचे निधन झाले.

हेही वाचा :

हे देखील वाचा