Saturday, July 6, 2024

अक्षय कुमारने भारतीयांना केले वानरसेना बनण्याचं आवाहन, स्वतःपासून केलीये सुरुवात

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने अयोध्येतील भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराच्या निर्माणासाठी उघडपणे निधी जमा करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय त्याने व्हिडिओमध्ये एक कथा देखील सांगितली आहे आणि लोकांना निधी दान करण्याचं आवाहनदेखील केलं आहे.

अक्षय कुमारने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की काल रात्री त्याने आपली मुलगी नितारा हिला राम सेतूच्या बांधकामाच्या वेळी खारुताईच्या प्रयत्नाबद्दल सांगितले होते, ज्यामुळे प्रभु श्रीराम लंका गाठू शकले होते. अक्षय म्हणाला, ‘आशा करतो की ही कहाणी सर्वांना प्रेरित करेल, जेणेकरून श्री राम मंदिराच्या उभारणीत आपण सर्व जण आपली भूमिका बजावू शकाल.’

अक्षय कुमारने ट्वीट करून लिहिले आहे की, ‘अयोध्येमध्ये श्री राम मंदिर उभारण्याचं काम सुरू झालं आहे ही फार आनंदाची बाब आहे. आता आपण योगदान देण्याची पाळी आली आहे. मी सुरुवात केली आहे. आशा आहे की आपणदेखील एकत्र याल. जय सियाराम!’

अक्षय कुमार व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो की, ‘आज आपला दिवस आहे. भगवान श्री राम यांचे भव्य मंदिर अयोध्येत उभारले जात आहे. आपल्यातील काही जणांना वानर बनले पाहिजे तर काहींना या ऐतिहासिक क्षणामध्ये खारुताई… प्रत्येकाला आपल्या धैर्यानुसार, क्षमतेनुसार आत्मसमर्पण करावं लागेल. मी सुद्धा ते केलं आहे. आशा आहे की आपण देखील लवकरच तसं कराल जेणेकरुन आपल्या आगामी पिढ्या भगवान श्री रामांनी शिकवलेल्या गोष्टींकडून प्रेरणा घेतील.’

या अगोदर, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्री राम मंदिर निर्माणासाठी निधीच्या रुपात ५ लाख १०० रुपये दिले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने देखील १ लाख रुपये निधी समर्पित करून इतरांना यात भाग घेण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं होतं.

या भव्य मंदिर निर्माणासाठी साडेपाच लाख खेड्यांमधून निधी संकलन करण्यात येणार आहे. ही मोहीम १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान चालविली जाईल. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून निधी संकलन केलं जात असून देशातील लोक मोठ्या प्रमाणात निधी समर्पण मोहिमेमध्ये भाग घेत आहेत.

हे देखील वाचा