अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. चित्रपटसृष्टीतील असो किंवा राजकारणातील, कंगना बऱ्याच वेळा इतरांच्या ट्विटला रीट्विट करत तिची मते मांडत असते.
मिळालेल्या वृत्तानुसार, कंगनावर लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात मुंबईच्या कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. अभिनेत्री कोर्टात हजर न राहिल्यामुळे हे वॉरंट देण्यात जारी करण्यात आले आहे. या वॉरंटसंदर्भात कंगनानेही ट्विट केले आहे, यावरूनही अभिनेत्रीला हे वॉरंट मिळाल्याचे कळून येते. अभिनेत्रीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “गीधडाचा एक कळप आणि सिहीन मात्र एकटी, मजा येईल.”
गीतकार जावेद अख्तरच्या तक्रारीवरून कोर्टाने अभिनेत्री कंगना राणावतला समन्स बजावले असल्याची माहिती मिळतेय. “जावेद अख्तर यांनी या अभिनेत्रीविरोधात तक्रार दिल्यानंतर कथित मानहानीची तक्रार केली गेली आणि यात पुढील तपास आवश्यक आहे”, असे मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले. डिसेंबर 2020 मध्ये अंधेरी मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी यांनी जुहू पोलिसांना, कंगनाच्या विरूद्ध केल्या गेलेल्या मानहानीच्या तक्रारीचा तपास करण्याचे निर्देश दिले होते.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, राणावत यांच्यावर फिर्यादी (अख्तर) यांनी केलेल्या आरोपांचे अधिक तपास केले जात आहेत. कोर्टाने या प्रकरणातील सुनावणीची पुढील तारीख 1 मार्च निश्चित केली आहे. अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांनी सोमवारी कोर्टाला सांगितले की पोलिसांनी गेल्या महिन्यात कंगनाला समन्स बजावले होते. तसेच, तिचे निवेदन नोंदवण्यासाठी पोलिसांसमोर हजर राहावे असेही सांगितले होते.
परंतु या संदर्भात अभिनेत्रीने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. गेल्या वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर एका मुलाखतीत कंगनाने त्यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पण्या केल्या असल्याचा आरोप अख्तर यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. कंगनाने केलेल्या “निराधार टिप्पण्या”मुळे त्यांची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे असा दावाही गीतकार जावेद अख्तर यांनी केला आहे.