Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड पेंटर बनण्याची इच्छा असणाऱ्या मुलाने चित्रपटाचे शुटिंग पाहिले, मनं बदललं आणि आज झालाय इंडस्ट्रीतील ‘बाप’ दिग्दर्शक

पेंटर बनण्याची इच्छा असणाऱ्या मुलाने चित्रपटाचे शुटिंग पाहिले, मनं बदललं आणि आज झालाय इंडस्ट्रीतील ‘बाप’ दिग्दर्शक

बॉलिवूड चित्रपट निर्माते प्रकाश झा यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1952 रोजी बिहार येथे झाला होता. ‘गंगा जल’, ‘राजनीती’ आणि ‘सत्याग्रह’ सारखे सुपरहिट चित्रपट बनविणारे प्रकाश झा यांना कोण ओळखत नाही! त्यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल तिलैया आणि केंद्रीय विद्यालय बोकारो येथे झाले. यानंतर ते दिल्लीत पदवी घेण्यासाठी गेले. त्यांना लहानपणी पेंटर बनण्याची खूप इच्छा होती. पण जेव्हा मुंबईत आल्यानंतर ‘धर्म’ चित्रपटाचे शूटींग पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी ठरविले की आपणही चित्रपट निर्माताच व्हावे. यासाठी त्यांनी 1973 साली फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन संस्थेत प्रवेश घेतला.

प्रकाश झा यांचा चित्रपट प्रवास 1984 मध्ये ‘हिप हिप हुर्रे’ या चित्रपटाने सुरू झाला. यानंतर, त्यांनी जो चित्रपट बनवला त्याची गणना अजूनही भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात शक्तिशाली चित्रपटांमध्ये केली जाते. तो चित्रपट होता, “दामूल”. बंधूबांधित मजुरांच्या कथेवर आधारित या चित्रपटानंतर, प्रकाश झा यांची प्रतिमा राजकारणाची समज असलेल्या चित्रपट दिग्दर्शकांमध्ये झाली. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. प्रसिद्ध लेखक विजयदान देथा यांच्या कथेवर आधारित त्यांचा पुढचा ‘परिणीती’ या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. यानंतर त्यांचा पुढील चित्रपट होता मृत्युदंड. या चित्रपटात माधुरी दीक्षित, शबाना आझमी आणि ओम पुरी अशा मोठ्या कलाकारांनी काम केले.

प्रकाश झा आणि दीप्ती नवल यांचे 1985 मध्ये लग्न झाले होते, परंतु 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली, जिचे नाव दिशा झा आहे. घटस्फोटानंतरही दोघांचे खूप चांगले संबंध आहेत. एका मुलाखतीत दीप्ती नवलने प्रकाश झाबरोबर तिच्या नात्याबद्दल सांगितले होते.

त्या म्हणाल्या, “प्रकाश जी आणि माझे कधी भांडण झाले नाही किंवा आमच्यात कटुताही नव्हती. त्यावेळी आम्हाला वाटले की आमचे मार्ग भिन्न आहेत. ते दिल्लीला गेले, पण मी इथेच राहिले. कारण माझे अभिनय जग इथलेच होते. पण आज जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला असे वाटते की लग्नाला थोडा वेळ द्यायला हवा होता. मी फक्त अभिनयासाठी भारतात आले होते. त्यावेळी मला लग्नाचे महत्त्व समजले असते तर मी आणखी प्रयत्न केले असते. माझ्या समोर प्रतिभावान आणि चांगली लोक होती. त्या वयात मला माझा निर्णय योग्य वाटला. माझी विचारसरणी वेगळी आहे, परंतु आता मी पुढे गेले आहे. माझे स्वतःचे निर्णय घेण्याची हिम्मत माझ्यात आहे.”

एशियन एजला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले होते. ते म्हणाले, “दीप्ती आणि मी आजही चांगले मित्र आहोत. एकही दिवस असा जात नाही, जेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये येत नाही किंवा मी तिच्याशी बोलत नाही. ती एक चांगली गायिका, अभिनेत्री आणि चित्रकार आहे. ती खूप हुशारही आहे. तथापि, लग्नाच्या काही काळानंतर आम्हाला वाटले की आम्ही एकत्र असताना पुढे जात नाही आहोत. आम्हाला जे साध्य करायचे होते ते करण्यास आम्ही असमर्थ होतो. म्हणून आम्ही विभक्त झालो. आज आमचं आयुष्य जे काही आहे, आम्ही त्यात आनंदी आहोत. आम्ही नेहमीच एकमेकांसाठी उभे राहतो.”

हे देखील वाचा