ज्या लग्नाची संपूर्ण चित्रपट जगताला उत्सुकता लागली होती, तो आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. आलिया आणि रणबीर कपूरच्या प्रेमप्रकरणाची सिनेसृष्टीत अनेक महिन्यांपासून चर्चा रंगली होती. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनी कायमचीच लग्न गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर आलियाची गोड केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता पडद्यावर रोमान्स करणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र असणार आहे. याआधीही अशा अनेक कलाकारांनी चित्रपटात एकत्र काम केले आणि ते खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडेदार बनले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवरून सुरू झालेला हा प्रवास लग्नाच्या मंडपापर्यंत नेणारी अनेक जोडपी बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. कोणते आहेत ते अभिनेते आणि अभिनेत्री चला जाणून घेऊ.
आलिया भट्ट- रणबीर कपूर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडचे क्यूट कपल आहे, ज्यांनी आता लग्नगाठ बांधली आहे. आलिया आणि रणबीर एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत असतील, पण त्यांची प्रेमकहाणी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि त्यानंतर सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) रिसेप्शनमध्ये दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. त्याचबरोबर आता आलिया आणि रणबीरने त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात केली आहे.
रणवीर सिंग – दीपिका पदुकोण
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने आपल्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमधील बाजीराव आणि मस्तानी म्हणून ही जोडी ओळखली जाते. दोघांनी अनेकदा एकमेकांबद्दलचे प्रेम जाहीरपणे व्यक्त केले आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची प्रेमकहाणी ‘राम लीला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली आणि त्यानंतर दोघे ‘बाजीराव मस्तानी’मध्येही एकत्र दिसले. रणबीर आणि दीपिकाने एकमेकांना पाच वर्षे डेट केले आणि त्यानंतर २०१८ मध्ये इटलीमध्ये दोघांनी लग्न केले.
करीना कपूर – सैफ अली खान
करीना कपूर आणि सैफ अली खान यांची लव्हस्टोरी खूपच मजेदार आहे. दोघांची पहिली भेट ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या दिवसांत करीना कपूर शाहिद कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. पण या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हळूहळू करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यात जवळीक वाढू लागली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. करीना आणि सैफ त्यांच्या वयातील अंतरामुळे खूप ट्रोल झाले होते. पण त्यांनी २०१२ मध्ये या चर्चांना पूर्णविराम देत लग्न केले.
अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नावांशिवाय बॉलिवूड जगताच्या लवस्टोरीच पूर्ण होऊ शकत नाहीत . अभिषेक आणि ऐश्वर्याने ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ ना कहो’, ‘उमराव जान’, ‘धूम २’ आणि ‘गुरू’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. न्यूयॉर्कमध्ये ‘गुरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. त्यानंतर २००७ मध्ये दोघांनी लग्न केले.
अमिताभ बच्चन – जया बच्चन
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचीही केमिस्ट्री एका चित्रपटाच्या सेटवरुनच सुरू झाली होती. गुड्डू चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसले नसले तरी त्यांच्या भेटी मात्र वाढल्या होत्या. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या पडद्यावरील मैत्रीमधूनच त्यांचे प्रेम वाढत गेले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –