Saturday, July 6, 2024

सेल्फी हवीय मग मारा पुश- अप्स! मिलिंद सोमण यांनी भरबाजारात साडी नेसलेल्या महिलेला करायला लावले ‘पुश-अप्स’

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण फिटनेसच्या बाबतीत अनेकदा चर्चेत येत असतात. ते केवळ स्वत: ची आणि आपल्या कुटुंबाच्याच तंदुरुस्तीची काळजी घेत नाहीत, तर आपल्या चाहत्यांना देखील तंदुरुस्त राहण्यास प्रवृत्त करत असतात. मिलिंद सोमण बऱ्याचदा आपले फिटनेस व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी टिप्स देतात. आता अलीकडेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो बराच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये मिलिंद सोमण एका महिला चाहतीकडून चक्क पुश-अप्स करवून घेताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ मिलिंद सोमण यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यात आपण पाहू शकतो की, एक महिला साडी नेसून पुश-अप्स मारत आहे. यातील खास गोष्ट म्हणजे, अभिनेत्याच्या सांगण्यावरून अगदी नि: संकोच होऊन, ती स्त्री रस्त्याच्या मध्यभागी पुश-अप्स मारू लागते. यासाठी आता सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. अनेक युजर्सने या महिलेच्या धैर्याचे कौतुक केले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत मिलिंद यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “सेल्फी वाल्यांसाठी माझे आवडते पुशअप्स. मी एका छोट्या बाजारात होतो. मला वाटतं, रायपूरमध्ये मी काही स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेत होतो. दरम्यान, एका महिलेने मला सेल्फीसाठी विचारले. मी 10 पुशअप्स म्हणताच, ती जमिनीवर होती आणि मी माझा कॅमेरा चालू करण्यापूर्वीच तिने पुशअप्स मारण्यास सुरुवात केली. ना साडीचा त्रास, ना आजूबाजूच्या लोकांची समस्या किंवा तिने कधीही पुश-अप केले नाही, याचीही चिंता नाही.”

पुढे त्यांनी लिहिले, “कधीकधी तुम्हाला अधिक चांगले आयुष्य जगताना सक्षम होण्यासाठी किंवा तुमच्या आवडत्या गोष्टी मिळवण्यासाठी, फक्त हो म्हणण्याची क्षमता असणे आवश्यक असते. होय, मी हे करू शकतो.”

अभिनेत्याचे ज्याप्रकारे महिलेकडून पुशअप्स करून घेतले, हे काहींना आवडले आहे. अनेकांना या गोष्टीचा रागही आला आहे की, अभिनेत्याने महिलेला सेल्फी देण्यासाठी पुश-अप्सची मागणी करण्यापूर्वी विचारही केला नाही की, ते बाजारामध्ये आहेत. एखाद्या महिलेकडून अशाप्रकारे पुश-अप्स करून घेणे चांगली नाही, ते पण तिने साडी नेसलेली असताना.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा