हिंदी सिनेसृष्टीमधे अनेक नवोदित गायक, गायिका येतच असतात. अभिनेते, अभिनेत्री यांच्याएवढेच महत्त्व गायक, गायिकांना असते. बऱ्याचदा गाण्यांमुळे देखील चित्रपटांना तूफान यश मिळते. आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या अनेक गायिका सध्या त्यांच्या आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये राज्य करत आहेत. यातीलच एक मोठे नाव म्हणजे पलक मुच्छल. पलकने अगदी कमी वेळात तिच्या आवाजाने बॉलिवूडसोबतच प्रेक्षकांची देखील मने जिंकली आहे. अशा या सुंदर आणि सुरेल गायिकेचा आज (३० मार्च) वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया पलकच्या गाण्याचा सुरेल प्रवास. चला तर मग सुरुवात करूया…
पलकचा जन्म ३० मार्च १९९२ रोजी इंदोरमध्ये, एका माहेश्वरी मारवाडी कुटुंबात झाला. आज पलक तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. पलकने वयाच्या चौथ्या वर्षीच तिच्या गायनाच्या करियरला सुरुवात केली. पलक तिच्या गायनासोबत सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. पलकने वयाच्या ९ व्या वर्षी २००१ मध्ये गुजरातच्या भूजमध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी जमा करून दिला होता. त्याच वर्षी तिचा Child For Children नावाचा पहिला अल्बम देखील प्रदर्शित झाला. यानंतर तिने अनेक जिंगल्स देखील केल्या.
काही काळ तिने गाण्याचे शिक्षण पूर्ण केले. २००६ साली पलक इंदोरवरून मुंबईला गाण्याच्या करियरसाठी शिफ्ट झाली. त्यानंतर काही वर्षांनी पलकने ‘दमादम’ नावाच्या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात तिने हिमेश रेशमियासारख्या संगीतकारासोबत काम करत ‘दमादम’ हे टायटल ट्रक गायले. मात्र, तिच्या या गाण्याला जास्त ओळख आणि पसंती मिळाली नाही.
पुढे दबंग खानने ‘एक था टायगर’ सिनेमासाठी यशराजकडे पलकचे नाव सुचवले. त्यानुसार या सिनेमात तिने गायक केके सोबत ‘लापता’ हे गाणे गायले आणि पलकला ओळख मिळाली. हे गाणे तुफान हिट झाले सोबतच पलकही इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाऊ लागली. २०१२ साली तिने अरिजित सिंगसोबत गाजलेल्या ‘आशिकी २’ सिनेमात ‘मेरी आशिकी’ आणि ‘चाहु मैं या ना’ ही लोकप्रिय गाणी गायली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
पलकने आतापर्यंत हिंदीसोबतच मराठी, बंगाली, गुजराती, उर्दू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, कन्नड, तेलुगु आदी अनेक भाषांमध्ये असंख्य गाणी गायली. २०१६ साली आलेल्या ‘धोनी’ सिनेमातील ‘कौन तुझे’ या गाण्याने तर तिच्या लोकप्रियतेमध्ये अधिकच वाढ केली. पलक एक उत्कृष्ट गायिकेसोबतच एक समाजसेविका देखील आहे. वयाच्या ९ वर्षापासूनच तिने तिच्या गायनातून अनेक सेवाभावी संस्थांना मदत केली.
कारगिल युद्धात शाहिद झालेल्या जवानांच्या घरच्यांना, ओडिशामध्ये आलेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना तिने खूप मदत केली. शिवाय तिने जेव्हापासून तिचे गायनाचे करियर चालू केले, तेव्हापासूनच ती तिच्या कमाईमधून हृदयविकार असलेल्या लोकांचे विनामूल्य ऑपरेशन करण्यासाठी मदत करते. ती अनेकदा चॅरिटीसाठी शो करते. आतापर्यंत तिने ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये चॅरिटी शो करून कमावले असून, याचा वापर तिने गरीब, अनाथ मुलांच्या उपचारासाठी केला आहे. तिने आतापर्यंत २२०० पेक्षा अधिक लोकांचे ऑपरेशन केले आहे.
https://www.instagram.com/p/CKhDGLpHYvF/?utm_source=ig_web_copy_link
पलक आणि सलमान खान यांचे नाते खूप खास आहे. पलक सलमान खानला तिचा मेंटॉर मानते. सलमानमुळेच पलकला अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये गायनाची संधी मिळाली. पलकचे जगात करोडो फॅन्स आहे यातलाच एक फॅन म्हणजे भाईजान सलमान खान. हो सलमान खानला पलकचा आवाज खूप आवडतो. पलकने सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’, ‘एक था टाइगर’, ‘बजरंगी भाईजान’ ‘जय हो’, ‘किक’ आदी सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे.
शिवाय तिने ‘एमएस धोनी’, ‘आशिकी’, ‘रुस्तम’, ‘गब्बर इज बॅक’, ‘हीरो’, ‘मिकी वायरस’, ‘इश्क के परिंदे’, ‘बाहुबली’ ‘राज रीबूट’ आदी अनेक सिनेमांसाठी तिचा आवाज दिला. पलकच्या आवाजासोबतच प्रेक्षकांना तिचे कुरळे केस देखील खूप भावतात. तिचे केस देखील तिच्या आवाजाप्रमाणे तिची ओळख बनले आहे.
अतिशय कमी वयात पलकचे तिच्या सामाजिक कार्यांमुळे ‘गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवण्यात आले आहे. यासोबतच विविध पुरस्कारांनी तिचा गौरव देखील केला आहे. पलक अनेकदा तिच्या मुलाखतीदरम्यान सांगत असते की, जर ती गायिका नसती, तर ती एक कार्डियाक सर्जन नक्कीच असती.
पलकला तिच्या अतुलनीय योगदासाठी विविध स्तरांवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात वर्ष २००० साली ‘नॅशनल चाइल्ड अवॉर्ड’, ‘२००५ साली राजीव गांधी अवॉर्ड’, ‘२०११ मध्ये वीरांगना अवॉर्ड’ सोबतच अनेक विविध पुरस्कारांनी तिचा गौरव झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-