बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक वरचढ गायक झाले, त्यांचे नाव आज देखील प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. सगळेजण उत्सुकतेने त्यांचे गाणे ऐकत असतात. ‘मेरे पिया गए रंगून’ आणि ‘कजरा मोहब्बत वाला’ ही गाणी सुद्धा अश्याच एका महान गायिकेने गायली होती. या गाण्यांना स्वतःचा आवाज देणाऱ्या गायिका शमशाद बेगम यांची 14 एप्रिल रोजी जयंती झाली. त्यांचा कोमल आवाज आज देखील लोकांच्या कानामध्ये गुणगुणत आहे. शमशाद बेगम या भारतीय हिंदी चित्रपटातील असे एक नाव आहे, ज्याला संगीत प्रेमी कधीच विसरू शकत नाहीत.
शमशाद बेगम यांचा जन्म 14 एप्रिल 1919 ला अमृतसरमध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या गायनाची सुरुवात रेडिओ पासून केली होती. सन 1937 मध्ये शमशाद बेगम यांनी लाहोर रेडिओवर त्यांचे पहिले गाणे सादर केले होते. नंतर सन 1944 मध्ये त्यांनी त्यांचे पहिले पाऊल मुंबईमध्ये ठेवले होते. त्यानंतर पूर्ण जगाने शमशाद बेगम यांच्या आवाजाच्या जादूचा अनुभव घेतला. त्यांनी ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘लेके पहला पहला प्यार’, ‘मेरे पिया गए रंगून’, यासारखी असंख्य गाणी त्यांच्या चाहत्यांना दिली आहेत.
त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक भाषांमध्ये सहा हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. शमशाद बेगम त्यांच्या काळातली सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या गायिका होत्या. बेगम साहिबा दिसायला देखील खूप सुंदर होत्या.. त्यांच्या सुंदरतेसमोर मोठमोठ्या अभिनेत्री देखील फिक्या पडत असायच्या. जेव्हा त्या त्यांच्या गाण्याने सगळ्यांमध्ये धुमाकूळ घालत होत्या, तेव्हाच त्यांना सिनेमांमध्ये सुद्धा अभिनयासाठी ऑफर आल्या, परंतु परिवाराच्या जुन्या विचाराच्या पद्धतीमुळे त्यांनी त्या ऑफर नाकारल्या होत्या.
शमशाद बेगम यांचे लग्न खूपच वाद-विवादामध्ये होते. त्या जेव्हा प्रगतीच्या दिशेने जात होत्या, त्यावेळी त्यांच्या घरची मंडळी त्यांच्यासाठी मुलगा शोधत होती, परंतु शमशाद यांनी जीवन साथीचा शोध पूर्ण केला होता. त्या ज्याच्यावर प्रेम करत होत्या त्याच्यासोबतच लग्न करण्याची इच्छा होती. ही गोष्ट 1934 मधील आहे. त्यावेळी देशांमध्ये हिंदू मुस्लमानांमध्ये मोठे वाद चालू होते. याच वर्षी त्यांची भेट गणपतलाल बटू यांच्यासोबत झाली. दोघे एकमेकांना खूप आवडत होते . दोघांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता, परंतु त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले. ज्यावेळी शमशाद बेगम यांचे लग्न झाले तेव्हा त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये ‘ओ गाडी वाले गाडी धीरे हाक रे'(मदर इंडिया),’कहीपे निगाहे कहीपे निशाना'(सीआयडी), ‘कभी आर कभी पार लगा तीरे- नजर’ (आर-पार) ‘मेरे पिया गए रंगून'(पतंगा),’छोड बाबुल का घर'(बाबुल),’कजरा मोहब्बत वाला'(किस्मत),’दुर कोई गाये'(बैजू बावरा),’न बोल पीपी मोरे अंगना'(दुलारी) आणि ‘एक दो तीन आजा मौसम है रंगीन'(आवारा) यांसारखी गाणी समाविष्ट आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. 2009 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सन 2013 मध्ये 23 एप्रिलला शमशाद बेगम यांचे निधन झाले.