फिल्मी जगतातील अनेक कलाकार सतत धावपळीत, नवीन प्रोजेक्ट्सच्या शोधात आणि व्यस्त वेळापत्रकात गुंतलेले असतात. मात्र, या धावपळीत अनेकांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देणे कठीण जाते. त्याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे अनुभवी अभिनेते बोमन इराणी (Boman Irani)यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक आणि क्रिप्टिक पोस्ट शेअर करत फॅन्सची उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढवली आहेत.
प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ चित्रपटात बोमन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी अचानक अशी पोस्ट शेअर केली की फॅन्सने तर्क लावायला सुरुवात केली – बोमन बॉलिवूडपासून काही काळ दूर जाणार का?
बोमन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे तुम्हाला तो दिवस आठवतो का, जेव्हा सर्व काही सारखं, कंटाळवाणं वाटू लागतं? जुन्याच कथा, तेच ड्रामा. खरं सांगायचं तर, मी थकलो आहे. कदाचित आता थोडं दूर जाण्याची वेळ आली आहे. कुठलाही गोंधळ नाही, कुठलंही ड्रामा नाही. मी ठीक आहे, फक्त थोडी श्वास घेण्याची गरज आहे. जास्त काही समजू नका.”
या पोस्टनंतर फॅन्समध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी कमेंट्समधून त्यांची काळजी व्यक्त केली आहे.
बोमन इराणींनी बॉलिवूडमध्ये तसे उशिरा पदार्पण केले. 44 व्या वर्षी त्यांनी Hindi फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि 2003 च्या ‘डरना मना है’द्वारे मोठ्या पडद्यावर झळकले. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्नाभाई M.B.B.S.’मधील डॉक्टर अस्थाना यांच्या संस्मरणीय भूमिकेमुळे.
दरम्यान, ‘द राजा साब’च्या टीमने बोमन यांच्या कॅरेक्टरचा पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज केला असून त्यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभासची ही हॉर-कॉमेडी 9 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.










