Saturday, July 6, 2024

खूपच वाईट गेलं वर्ष! ‘या’ पाच वादांनी गाजवलं बॉलीवूडकरांचं २०२० वर्ष

तसं पाहायला गेलं तर २०२० हे वर्ष काही खास ठरलं नाही. मानवी इतिहासंमधील सर्वात वाईट वर्षांमध्ये २०२० या वर्षाची गणना केली जातेय इतपत हे वर्ष सगळ्यांसाठीच वाईट गेलं आहे. भारतात हे वर्ष अधिकतर करोना व्हायरस आणि लॉक डाऊन यासाठी तर लक्षात राहिलंच परंतु याहीपेक्षा आणखीन एक कारणासाठी हे वर्ष चिरकाल स्मरणात राहील ते म्हणजे बॉलिवूडचे या वर्षातील वाद! बॉलिवूडच्या १०० वर्षांच्या इतिहासात अनेक वाद विवाद झाले असतील परंतु या एका वर्षात जितके वाद लोकांसमोर आले किंवा उकरून काढले गेले ते यापूर्वी कधीच झालं नव्हतं!

एकीकडे देशात कडक लॉकडाऊन लागला होता. परंतु या विवादांसाठी मात्र कोणतीच ताळेबंदी लागली नव्हती. या सर्व विवादांमध्ये सोशल मीडियाची भूमिका फारच महत्त्वाची ठरली. यातून समोर आलेले काही वाद तर थेट कोर्टाची पायरी चढले. कोणते आहेत हे वाद एक नजर टाकूयात!

दीपिका पादुकोण – छपाकच्या रिलीजपूर्वी जेएनयू दौरा
या वर्षाच्या सुरुवातीलाच वादांचे केंद्र बनलेली दीपिका पादुकोण, जीचा यावर्षीचा छपाक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वास्तविक, दीपिकाने जानेवारीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगदी आधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिली होती, तिथे काही विद्यार्थी पोलिसांविरोधात निदर्शनास बसले होते. दीपिकाची ही भेट सोशल मीडियावर चांगलीच गाजली. तिच्या चित्रपटातील विशेषतः एका पात्राचे नाव मुस्लिम ते हिंदू असे बदलण्यात आले आहे असा आरोप होता. परंतु, ही बातमी खोटी असल्याचं नंतर सिद्ध झाले. ट्विटरवर दीपिकाच्या चित्रपटाविरूद्ध हॅशटॅग चालवण्यात आलं होतं. इतकंच काय तर काही ठिकाणी तिला विरोध दर्शवण्यासाठी तिच्या चित्रपटाची तिकिटं मोफत वाटण्यात आली होती.

कनिका कपूर- बॉलीवुडमधील पहिली कोविड-19 पॉजिटिव्ह सेलेब्रिटी
मार्चच्या मध्यापासून देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली. सावधगिरी बाळगण्यासाठी मार्गदर्शक सूचना जेव्हा देशभरात लागू केल्या गेल्या तेव्हा बॉलिवूड गायक कनिका कपूर हिला कोविड -१९ चा संसर्ग झाल्यामुळे खळबळ उडाली. कनिका कोरोना बाधित होणारी बॉलिवूडची पहिली सेलिब्रिटी बनली. परंतु,खरी समस्या कनिका कोरोना पॉझिटिव्ह होण्यात नव्हती, उलट लंडनहून आगमन झाल्यानंतर विलगीकरणात राहण्याऐवजी पार्टी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आणि ज्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका सुमारे ३०० लोकांमध्ये वाढला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी कनिकाविरूद्ध पोलिस अहवालही दाखल केला होता. कनिकाला कोव्हीड१९ची टेस्ट निगेटिव्ह होण्यापूर्वी कित्येक दिवस लखनौच्या वैद्यकीय संस्थांमध्ये भरती करण्यात आलं होतं.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू- हत्या की आत्महत्या?
यावर्षी सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला. परंतु, सुशांतचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्या कारणावरून यावर बरेच वादंग निर्माण झाले. त्याचा प्रभाव बॉलिवूडमध्येही पाहायला मिळाला. सुशांतच्या मृत्यूच्या कारणावरून अनेक सेलेब्रिटींमध्ये फूट पडलेली दिसली. सुशांतला न्याय मिळवून देण्याची लढाई हळूहळू कडवट झाली आणि या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हीच्यामुळे बॉलिवूड सेलिब्रिटी दोन गटांमध्ये विभागले गेले. या वादांच्या निशाण्यावर करण जोहर, आलिया भट्ट, सोनम कपूर आणि सर्व सेलिब्रिटी मुलं आली. १४ जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आढळला होता. याप्रकरणी पुढील तपास सीबीआय करत आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचे सापळे – अनेक सेलिब्रिटी आहेत निशाण्यावर
सुशांतच्या मृत्यूनंतर अंमलबजावणी संचालनालयाला रिया चक्रवर्ती यांच्या चौकशी दरम्यान व्हॉट्सअप चॅट्स मिळाल्या, ज्याच्या आधारे ड्रग एंगल यात समाविष्ट केला गेला. सुशांतचा ड्रगचा वापर उघडकीस आला. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या तपासणीत जसजशी वाढ झाली तसतशी अनेक ड्रग पेडलर्सना अटक केली गेली. ज्यादरम्यान बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सची नावे पुढे आली, ज्यांची एनसीबीने कसून चौकशी देखील केली.
अर्जुन रामपाल, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत, श्रद्धा कपूर यांची चौकशी केली गेली. राज्यसभेतही जया बच्चन यांनी अभिनेता आणि खासदार रवी किशन यांच्यावर बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांच्या वापराच्या विधानावर हल्ला चढवला होता.

कंगना रनौत Vs बीएमसी Vs महाराष्ट्र सरकार Vs दिलजीत दोसांझ
यावर्षी कंगना रनौत बर्‍याच वादात सापडली आहे. सुशांतच्या निधनानंतर कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेपोटीझमचा मुद्दा उपस्थित केला आणि सुशांतच्या मृत्यूमागे बॉलिवूडमधील कौटुंबिकता आणि गटबाजीला तिने दोष दिला. यासाठी कंगनाने करण जोहर आणि भट्ट कुटुंबावर निशाणा साधला. महाराष्ट्र पोलिस आणि सरकार बद्दलदेखील तिने अनेक वादग्रस्त ट्विटस केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि बीएमसीशी झालेल्या भांडणावरूनही कंगना वादात सापडली होती. बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप झाल्यानंतर पालिकेने पाली हिल येथील कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. त्याचबरोबर कंगनाच्या विवादास्पद ट्विट्सबद्दल पोलिस अहवालही दाखल करण्यात आला. अलीकडेच कंगना पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ याच्याबरोबर ट्विटरवर चर्चेत आली होती. त्यानंतर कंगनाने शेतकरी चळवळीबाबत काही वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे दिलजीत दोसांज याने कंगनाला ट्विटरवरून खडसावलं.

अनुराग कश्यपवर लागलेला लैंगिक छळाचा आरोप
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यावर्षी वादात सापडला जेव्हा अभिनेत्री पायल घोषने त्याच्यावर घरी बोलावून लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलिस अहवालही दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, अनुराग यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून हे आरोप जोरदारपणे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातही जोरदारपणे राजकारण केलं गेलं.

भूषण कुमारवर सोनू निगम यांनी गंभीर आरोप केले
२०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान सेलिब्रेटींना त्यांच्या घरात कैद केलं गेलं होतं. सुशांतच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या इनसाइडर-आऊटसाइडर या प्रकरणावर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत या व्हिडिओच्या माध्यमातून टी सिरीजचे मालक भूषण कुमार याच्यावर अनेक आरोप केले. या आरोपांमुळे बर्‍याच मोठ्या वादाला तोंड फुटलं आणि भूषणची पत्नी दिव्या खोसला कुमार यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आणि सोनू निगम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

हे देखील वाचा