सालातील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. 23 जानेवारी रोजी हा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार असून, चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतेच चित्रपटातील आयकॉनिक गाणे ‘घर कब आओगे’ प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहे आणि सोशल मीडियावरही मोठी प्रशंसा मिळवत आहे. मात्र, आता ‘बॉर्डर 2’चा(border 2) मार्ग तितका सोपा राहिलेला नाही. त्याच दिवशी साऊथ इंडियन ऐतिहासिक अॅक्शन-ड्रामा ‘द्रौपदी 2’ देखील रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘द्रौपदी 2’ संदर्भातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे या चित्रपटाचे अतिशय कमी कालावधीत झालेले शूटिंग. एका मुलाखतीत दिग्दर्शक मोहन जी. क्षत्रियन यांनी खुलासा केला की, संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग अवघ्या 31 दिवसांत पूर्ण करण्यात आले. ते म्हणाले, “आमचा प्रयत्न 30 दिवसांत शूटिंग पूर्ण करण्याचा होता, मात्र काही अडचणींमुळे एक दिवस वाढवावा लागला.”
चित्रपटाचा एकूण रनटाइम 2 तास 39 मिनिटे इतका आहे. विशेष म्हणजे, यामधील केवळ 8 ते 9 मिनिटांची कथा 2025 सालात घडते, तर उर्वरित संपूर्ण कथा प्रेक्षकांना 14व्या शतकात घेऊन जाते, जिथे सत्ता, संघर्ष आणि इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे.
‘द्रौपदी 2’ हा एक ऐतिहासिक अॅक्शन-ड्रामा असून, यात रिचर्ड ऋषी आणि रक्षणा इंदुसन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन जी. क्षत्रियन यांनी केले असून, ही कथा इतिहासकार अन्नाल कंदर यांच्या ‘मूंद्रम वल्लाल महाराजा’ या पुस्तकावर आधारित आहे.
दिग्दर्शकांच्या मते, चित्रपटातील प्रमुख ऐतिहासिक घटना पूर्णपणे सत्य घटनांवर आधारित आहेत. मात्र, पात्रांना अधिक खोलवर उलगडण्यासाठी सिनेमॅटिक फिक्शनचा आधार घेण्यात आला आहे. या विषयावर सखोल संशोधन करण्यासाठी त्यांनी अनेक इतिहासतज्ज्ञांची भेट घेतली असून, स्क्रिप्ट पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागल्याचेही त्यांनी सांगितले.
‘द्रौपदी 2’ हा 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘द्रौपदी’चा सिक्वेल आहे. पहिल्या भागातही रिचर्ड ऋषी मुख्य भूमिकेत होते, तर शीला राजकुमार फीमेल लीडमध्ये दिसल्या होत्या. रिलीजच्या वेळी या चित्रपटाला प्रामुख्याने नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
जातिवादाशी संबंधित वादामुळे हा चित्रपट मोठ्या चर्चेत आला होता. काही समीक्षकांनी चित्रपटावर जातीय विचारसरणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. मात्र, वाद असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. अवघ्या 50 लाखांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 10 कोटींची कमाई केली होती.
एका बाजूला सनी देओलचा देशभक्तीने भरलेला ‘बॉर्डर 2’, तर दुसऱ्या बाजूला इतिहास आणि अॅक्शनचा तडका असलेला ‘द्रौपदी 2’ — 23 जानेवारी रोजी प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे दोन मोठे पर्याय असणार आहेत. आता या थेट बॉक्स ऑफिस क्लॅशमध्ये प्रेक्षकांचे मन कोण जिंकते, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










