सनी देओल यांच्या चाहत्यांना ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या क्षणासाठी आता थोडा अधिक संयम ठेवावा लागणार आहे. बहुप्रतीक्षित वॉर ड्रामा ‘बॉर्डर 2’ आज, 23 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. मात्र रिलीजच्या दिवशीच चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. देशातील अनेक भागांमध्ये कंटेंट डिलिव्हरीला उशीर झाल्यामुळे सकाळचे शो रद्द करण्यात आले असून, त्यामुळे सुरुवातीच्या प्रेक्षकांची निराशा झाली आहे. मात्र ही अडचण तात्पुरती असल्याचं एग्झिबिटर्सनी स्पष्ट केलं असून, शुक्रवार सकाळपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अनुराग सिंग (Anurag Singh) दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा जे. पी. दत्तांच्या 1997 मधील सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडपूर्वी 23 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने जोरदार अॅडव्हान्स बुकिंग पाहता अनेक शहरांमध्ये सकाळी 7.30 आणि 8 वाजताचे शो ठेवण्यात आले होते. मात्र, रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचं अंतिम कंटेंट गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तयार होऊ शकले नाही. UFO Moviezसारख्या डिजिटल डिलिव्हरी प्लॅटफॉर्मकडून सिनेमागृहांना कंटेंट उशिरा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. एका वरिष्ठ ट्रेड तज्ज्ञाने सांगितले की, “कंटेंट अर्ध्या रात्रीनंतर मिळेल अशी अपेक्षा होती, त्यामुळे सकाळचे शो होणं कठीणच होतं.”
रिपोर्ट्सनुसार UFO Moviezकडून पाठवण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप संदेशात सकाळी 6.30 वाजल्यानंतरच कंटेंट डाउनलोड सुरू होईल, असं सांगण्यात आलं होतं. ‘बॉर्डर 2’चा रनटाइम 192 मिनिटे (सुमारे 3 तास 12 मिनिटे) असल्यामुळे पूर्ण डाउनलोड आणि स्क्रीनिंगसाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे सकाळी 8 किंवा 9 वाजताचे शो घेणं अशक्य ठरलं.
एका ट्रेड सोर्सने HTला दिलेल्या माहितीनुसार, कंटेंट डिलिव्हरीला उशीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळचे शो रद्द करण्यात आले, मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत देशभरात चित्रपटाचे शो सुरू होतील, असा विश्वास एग्झिबिटर्सनी व्यक्त केला आहे. म्हणजेच चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल, पण त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांत स्क्रीनिंग सुरू होणार आहे.
पहिल्या ‘बॉर्डर’प्रमाणेच ‘बॉर्डर 2’ही 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. यावेळी कथा नव्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक सिनेमॅटिक ट्रीटमेंटसह मांडण्यात आली आहे. चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा आपल्या दमदार अंदाजात झळकणार आहेत. तर वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे अनुक्रमे वायुसेना, थलसेना आणि नौसेनेतील खऱ्या युद्धनायकांच्या भूमिका साकारत आहेत.
विशेष म्हणजे, पहिल्या ‘बॉर्डर’मधील अक्षय खन्ना, सुनील शेट्टी आणि सुदेश बेरी हे कलाकार कॅमिओ भूमिकेत दिसणार असून, त्यांना डिजिटल डी-एजिंगद्वारे सादर करण्यात आलं आहे. हा चाहत्यांसाठी मोठा सरप्राईज मानला जात आहे.
ट्रेड सर्कलमध्ये ‘बॉर्डर 2’कडून जबरदस्त ओपनिंगची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंदाजानुसार चित्रपट पहिल्याच दिवशी ₹32 ते ₹35 कोटींची कमाई करू शकतो. दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग ठरू शकते, तर सनी देओल यांच्यासाठी ‘गदर 2’नंतरची दुसरी मोठी ओपनिंग मानली जात आहे.
भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे. पी. दत्ता आणि निधी दत्ता निर्मित या चित्रपटात मोना सिंह, सोनम बाजवा आणि अन्या सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एकूणच तांत्रिक अडचणी असूनही ‘बॉर्डर 2’बाबत प्रेक्षकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही आणि शो सुरू होताच सिनेमागृहांत देशभक्तीचा जोश पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
करण जोहरने राणी मुखर्जीला दिल खास सरप्राईज; लेकी आदिराचं पत्र पाहून राणीचे अश्रू अनावर










