×

महाराष्ट्रात ‘धर्मवीर’च जोरदार, पहिल्याच दिवशी केली २.०५ कोटींची घसघशीत कमाई!

धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वात माणसं जोडण्याची एक विलक्षण ताकद -कला होती. त्यांच्या याच करिष्म्याची प्रचिती पुन्हा एकदा आलीये आणि यावेळी निमित्त ठरलंय त्यांचा चरित्रपट असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट. काल १३ मे रोजी हा चित्रपट मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड मोठ्या दिमाखात अतिशय अभिमानाने झळकवले. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दी जमवण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.

तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांहून अधिक शोज् सह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांनी त्याचे दमदार स्वागत केले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटचा दुग्धाभिषेक केला, तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहचले. आपल्या लोककारणी नेत्याला चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले.

अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. प्रविण तरडे (Pravin Tarde) यांच्या लेखणीने सज्ज या चित्रपटातील आनंद दिघे यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या शिट्यांचा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. विविध थिएटर्समध्ये जणू उत्साहाने भरलेलं उत्सवी वातावरण बघायला मिळालं.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल दोन कोटी पाच लाखाची घसघशीत कमाई करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसरीकडे सिने समीक्षकांचाही अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक मान्यवर समीक्षकांनी ४ स्टार अशी रेटिंग देऊन चित्रपटाच्या दर्जेदारपणावर शिक्कामोर्तब केलंय. मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल, असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा

Latest Post