Tuesday, June 24, 2025
Home मराठी काय सांगता? ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील काॅमेडी क्वीनने तब्बल ४० नकार पचवलेत, पण कारण गंमतशीर

काय सांगता? ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील काॅमेडी क्वीनने तब्बल ४० नकार पचवलेत, पण कारण गंमतशीर

प्रतिभा असली की नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचता. ‘चला हवा येऊ द्या’ मधील प्रसिद्ध कलाकार स्नेहल शिदम ही देखील अशीच एक हरहुन्नरी अभिनेत्री. अभिनेत्रींसारखा चेहरा जरी नसला तरी प्रतिभेच्या जोरावर स्नेहलने यश मिळवले. ‘चला हवा येऊ द्या’च्या ‘होउ दे वायरल’ या पर्वाची स्नेहल विजेती ठरली आणि तिला घराघरात नवीन ओळख, लोकप्रियता मिळाली. स्नेहलची विनोदाची प्रतिभा उत्तम असल्याने ती हा शो जिंकल्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा एक महत्वाचा घटक बनली. स्नेहलने ‘माझा होशील ना’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांमधून देखील तिच्या अभिनयाची एक वेगळी बाजू सर्वांना दाखवली.

झी मराठीवरील सध्या सर्वत्र चर्चेत असणारा आणि जरा हटक्या फॉरमॅटचा ‘हे तर कायच नाय’ शो चांगलाच लोकप्रिय होत आहे. प्रत्येक भागात नवनवीन कलाकार येऊन त्यांचे वैयक्तिक अनुभव या शोमध्ये सांगत सर्वांना हसवताना दिसतात. नुकतीच स्नेहलने ‘हे तर कायच नाय’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या लग्नाचा एक मजेशीर किस्सा सर्वांसोबत शेअर केला. या भागाचा एक प्रोमो शोच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्नेहल तिच्या लग्नाच्या अनुभवाबद्दल सांगताना दिसत आहे.

स्नेहलने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले, “आमच्या घरात लग्नाचे वातावरण होते. माझ्या बहिणींची सुद्धा लग्न झाली होती. त्यामुळे मी लग्न करावे असा हट्ट सर्वच धरून होते. मग मी सुद्धा लग्नासाठी तयार झाले. मात्र नावनोंदणी वगैरे मी काही करणार नाही असे निक्षून सर्वांना सांगितले. त्यावर सगळ्यांनी मला त्याची काळजी करु नको ते सर्व आम्ही बघतो असे म्हटले. त्याच्यानंतर माझ्या बहिणींनी जवळपास ३० मुलांना माझे फोटो आणि प्रोफाइल पाठवले. सर्वांना वाटत होते की, कमीतकमी एकतरी मुलगा हो बोलेल आणि मला पण वाटले की आता आपण लग्न करुन सेटल होऊ.”

पुढे स्नेहलने सांगितले, “पण, त्या सर्व तीस मुलांनी मला नकार दिला. त्यामुळे माझ्यात इतकं काय वाईट आहे की तब्बल ३० पोरं एकाच वेळी मला नकार देतात. बरं त्यातली काही मुलं माझ्यापेक्षा जास्त छपरी होती. नंतर मी माझ्या घरातल्या लोकांना विचारले की तुम्ही माझा नक्की कोणता फोटो त्यांना पाठवला? ज्यामुळे मला सगळी मुलं नाही म्हणतायेत.” त्यानंतर, शोमध्ये स्नेहलच्या घरच्यांनी मुलांना तिचा कोणता फोटो पाठवला हे दाखवण्यात देखील आले. त्यांनी पाठवलेला फोटो हा तिच्या एका स्किटमधील होता, ज्यात स्नेहल एका राक्षसिणीची भूमिका साकारत होती. हा फोटो पाहिल्यावर दुसरा कोणताच फोटो सापडला नाही का असा प्रश्न स्नेहलने विचारला. त्यावर गुगलवर तुझे असेच फोटो आहेत असे त्यांनी तिला सांगितले. स्नेहलच्या या अनुभवाचाच हा किस्सा ऐकून सर्वच तुफान हसले.

हेही वाचा-

हे देखील वाचा