टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक दयानंद शेट्टी आहेत. ‘सीआयडी’ शोमध्ये ‘सिनियर इन्स्पेक्टर दया’ या भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. ‘सीआयडी’मधील त्यांचे दार तोडून घराघरांत एन्ट्री करणे हे प्रेक्षकांना रोमांचित करत असे. आता प्रेक्षकांचे लाडके अभिनेते दयानंद शेट्टी आता हिंदी कलाविश्र्वातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत.
दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) हे ‘गरम किटली’ (Garam Kitly) या मराठी चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गरम किटली’ या चित्रपटाची निर्मिती गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली केली जात आहे. तर या चित्रपटाचे चित्रसेन नाहक आणि राजेश सहनिर्माते आहेत. तसेच कथा, पटकथा आणि संवादलेखन राज पैठणकर करणार असून, तेच या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहेत. या चित्रपटात दयानंद कोणती भूमिका साकारणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्याचबरोबर या चित्रपटात त्यांच्यासोबत आदित्य पैठणकर व श्रद्धा महाजन ही नवी जोडी आणि विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील हे कलाकार दिसणार आहेत.
खेळाशी आहे जवळचे नाते
दयानंद आज भले प्रसिद्ध अभिनेते असतील, पण त्याआधी ते खेळाडू होते. त्यांचा क्रीडा जगताशी खोलवर संबंध आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दया हे डिस्कस थ्रो आणि शॉट पुटचे उत्कृष्ट खेळाडू होते. माध्यमांतील वृत्तानुसार, १९९६ मध्ये ते महाराष्ट्राचे डिस्कस थ्रो चॅम्पियन ठरले.
दुखापतीनंतर दयानंद क्रीडा जगतापासून दुरावले होते. यानंतर, त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या या दुसऱ्या पॅशनमध्ये पाऊल ठेवले. इथेही त्यांची मेहनत आणि प्रतिभा कामी आली. ‘सीआयडी’ या टीव्ही शोमध्ये दया त्यांच्या “जब दया का हाथ पड़ता है, तो मुंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है,” ते या प्रसिद्ध डायलॉगमुळे खूप प्रसिद्ध झाले होते.
‘सीआयडी’मध्ये मजबूत असल्याने दया यांची करण्यात आली निवड
दयानंद यांनी १९९८ मध्ये ‘सीआयडी’साठी ऑडिशन दिले होते. त्यांच्या मजबूत उंचीमुळे त्यांची निवड झाली. त्यानंतर ते बराच काळ या शोचा भाग होते. दया यांनी शोमध्ये ज्या पद्धतीने दरवाजा तोडला त्यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर दरवाजा तोडण्याचा विक्रम त्यांनी ठेवला असता, तर त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले असते.
दयानंद शेट्टी काही चित्रपटांमध्येही दिसले आहेत. ‘सिंघम रिटर्न्स’मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली. ‘दिलजले’, ‘जॉनी गद्दार’, ‘रनवे’ यांसारख्या चित्रपटातून त्यांनी आपली ताकद दाखवली आहे. ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ सारख्या रियॅलिटी शोमध्येही ते दिसले होते.