Wednesday, July 3, 2024

‘तुमच्या पिक्चरचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही’, ‘या’ कारणामुळे काँग्रेस नेत्याने साधला बिग बी आणि अक्षय कुमारवर निशाना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये पेट्रोल- डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणाही करण्यात आली. यानंतर काही दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वेगाने वाढ झाली. यावर बॉलिवूडचे अनेक कलाकार आक्षेप घेत प्रतिक्रिया देत आहेत, परंतु ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार अक्षय कुमार यांनी मौन बाळगले. ही गोष्ट महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पटली नाही. त्यांनी अक्षय आणि अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधत, त्यांच्या मौन बाळगण्यावर प्रश्न उपस्थित केले. इतकेच नाही तर त्यांनी मोदी सरकारवरही ताशेरे ओढले.

नाना पटोले यांनी ट्विटरवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारला टॅग करत लिहिले की, “युपीएच्या काळात इंधनाचे दर ७० रु झाल्यावर टीव टीव करणारे अमिताभ आणि अक्षय आज पेट्रोलचे दर १०० रु. झाल्यावरही गप्प का आहेत? सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या मोदी सरकारविरोधात गप्प असणाऱ्या या सेलिब्रिटींच्या पिक्चरचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही.

“युपीए सरकार लोकशाही मार्गाने काम करायचे, त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करायचे,” असेही युपीए सरकारबाबत बोलताना पटोले म्हणाले. पुढे मोदी सरकारबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पाहता देशात डिझेल २५ आणि पेट्रोल ३५ रुपये लिटरने विकले गेले पाहिजे.”

यासोबतच त्यांनी केंद्र सरकारला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचीही मागणी केली. नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर आपले मत मांडणारे अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी मौन बाळगल्याने नागरिकही प्रश्न उपस्थित करत आहेत. इतकेच नाही, तर सोशल मीडियावर युजर्सही त्यांना ट्रोल करत आहेत.

या कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अमिताभ बच्चन सध्या ‘मे डे’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, अंगिरा धर आणि बोमन इराणी हेदेखील मुख्य भूमिकेत  आहेत.

दुसरीकडे अक्षय कुमार सध्या ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारने भारतीयांना केले वानरसेना बनण्याचं आवाहन, स्वतःपासून केलीये सुरुवात
-महानायक अमिताभ बच्चन यांना ‘सर जी’ न म्हटल्यामुळे कादर खान यांना मिळाली होती शिक्षा, ऐका त्यांच्याच तोंडून

 

हे देखील वाचा