Friday, April 19, 2024

धक्कादायक! पंजाबी गायक सरदुल सिकंदर यांचे निधन, सिनेसृष्टीतून व्यक्त केली जातेय हळहळ

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे 24 फेब्रुवारी रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. मात्र अचानक सिकंदरच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिकंदरच्या मृत्यूबद्दल अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला.

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने सरदुल सिकंदर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ट्विट केले आहे. कपिलने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे, त्यांचे गाणे ऐकल्यानंतर सामान्य माणूसही स्वतःचे भान विसरत असे. माझे भाग्य आहे की माझ्या मुलीच्या पहिल्या लोहरीच्या प्रसंगी, पाजी पहिल्यांदा आमच्या घरी आले. आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो, पण मला ते माहीत नव्हते की ती भेट शेवटची असेल. तुमची खूप आठवण येईल. पाजी, ईश्वर तुम्हाला त्याच्या चरणी जागा देईल.”

त्याचवेळी, पंजाबी गायक दिलेर मेहंदी यांनीही सिकंदर यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “मोठ्या दु:खाची बातमी आहे, की सरदुल सिकंदर साहेब आपल्यात राहिले नाहीत. हे कुटुंबाचे आणि संगीत इंडस्ट्रीचे मोठे नुकसान आहे.”

सरदुल सिकंदर यांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. त्यांचा पहिला अल्बम 1980 साली आला होता. ‘रोडवेज द लारी’ असे या अल्बमचे नाव होते. यानंतर, त्यांनी बरेच अल्बम काढले. 1991 साली आलेल्या त्यांच्या ‘हुस्ना दे मल्को’ अल्बमने जगभरात धमाल केली होती. या अल्बमच्या सुमारे 5.1 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. तसेच, गाण्यांशिवाय त्यांनी बर्‍याच चित्रपटात अभिनय करून नाव कमावले होते. ‘जग्गा डाकू’ या पंजाबी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसाही झाली होती.

हे देखील वाचा