Wednesday, July 3, 2024

पुण्यतिथी : अभिनेत्री शशिकला कधीकाळी करायच्या घरकाम, ‘या’ अभिनेत्रीने मिळवून दिला होता पहिला चित्रपट

सत्तरचे दशक आपल्या अभिनयाने गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांनी १०० पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले असून, अनेक महत्वपूर्ण भूमिका निभावलेल्या आहेत. आरती (१९६२) या चित्रपटात मीना कुमारी, अशोक कुमार तसेच प्रदीप कुमार यांचा समावेश होता, यात शशिकला यांची नकारात्मक भूमिका खूप नावाजली गेली. ‘आई मिलन की बेला’, ‘खूबसुरत’, ‘अनुपमा’ यांसारख्या हिट चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. मुख्य नायिकेसमवेत त्यांनी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका देखील केल्या आहेत. २००७ ला त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा सत्तरच्या दशकातील हिट अभिनेत्री शशिकला यांचे ४ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.

खरं तर, मराठी कुटुंबात जन्मलेल्या शशिकला यांचे कुटुंब खूप श्रीमंत होते, आणि यांचे वडील एक मोठे उद्योगपती होते. ४ ऑगस्ट, १९३२ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या शशिकला यांनी बालवयातच आपल्या गायन, नृत्याची सुरुवात केली. त्याकाळी त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या नृत्याचे कार्यक्रम करायच्या. त्यावेळी शशिकला अवघ्या ५ वर्षांच्या होत्या. पण त्यांच्या नशिबात काय लिहिले होते, हे कुणास ठाऊक? एक वेळ अशी आली जेव्हा शशिकलाच्या वडिलांना भावामुळे तोटा झाला आणि जगणे कठीण झाले. त्यानंतर शशिकला यांच्या वडिलांनी कुटुंबीयांना मुंबईत आणले.

शशिकला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘माझे वडील सर्व कमाई धाकट्या भावाला पाठवत असत. तो लंडनमध्ये शिकत होता. आम्ही सहा भावंडे होतो. वडिलांनी आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या भावाच्या गरजा पूर्ण केल्या. एक काळ असा आला की, त्यांच्या धाकट्या भावाला म्हणजे माझ्या काकांना खूप चांगली नोकरी मिळाली. पण मग तो आमच्या कुटुंबाला विसरला. माझे वडील दिवाळखोर झाले. ते दिवस खूप कठीण होते. आम्हाला सुमारे ८ दिवस अन्न मिळाले नाही. घरी जेवायला कोणीतरी बोलवेल का? या प्रतीक्षेत होतो.’

शशिकला यांनी मुंबईत काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिला काही काम सापडले नाही. मुलाखतीत एकदा, शशिकला म्हणाल्या, ‘घरकाम करताना, त्यांना अभिनेत्री आणि गायिका नूर जहां भेटल्या. ज्यांना त्यांचा चेहरा खूप आवडला होता. नूर जहांने त्यांच्या पतीला सांगून त्यांना चित्रपटात काम देण्यास सांगितले.’ अशाप्रकारे, शशिकलाने १९४५ मध्ये ‘झीनत’ चित्रपटात काम केले, आणि या चित्रपटासाठी तिला २५ रुपये मोबदला मिळाला.

यानंतर, चित्रपटांना यश मिळाल्यानंतर, शशिकला यांनी अभिनेता के. एल. सेहगलचा नातेवाईक ओम प्रकाश सेहगलशी लग्न केले. काही वेळ दोघांसाठीही चांगला गेला. या दरम्यान, शशिकला यांनी दोन मुलींनाही जन्म दिला. पण नंतर दोघांमध्ये वाद आणि भांडण झाले. दोघांमधील तणाव इतका वाढला की, एक दिवस शशिकला आपले कुटुंब व मुली सोडून, एका माणसाबरोबर परदेशात गेल्या. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.

याबद्दल शशिकला एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘ज्या व्यक्तीबरोबर मी परदेशात गेले, त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. मोठ्या अडचणीने मी स्वत: चा बचाव करून भारतात परतले.’ परतल्यानंतर लवकरच, शशिकला यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्या बॉलिवूडपासून दूर होत्या. त्यांची मुलगी आणि सून यांच्याबरोबर त्या राहत होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा