Sunday, July 14, 2024

Nilu Phule जन्मदिन विशेष | महाराष्ट्रातल्या मातीतला ‘खलनायकी’ अन् ‘रांगडा चेहरा’ म्हणजे निळू भाऊ

मराठी सिनेसृष्टीमधे आपल्या भारदस्त आवाजाने, दमदार अभिनयाने आणि ‘बाई वाड्यावर या…’ या संवादाने प्रेक्षकांच्या मनात राग आणि आदर या दोन्ही भावना निर्माण होतात आणि आठवतात निळू फुले. त्यांनी त्यांच्या जबरदस्त अभिनयाने तब्बल ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज त्यांच्या जाण्यानंतरही ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या स्मृतीत आहे.

निळू फुले मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे एक रांगडे व्यक्तिमत्व. निळू भाऊंनी ‘एक गाव बारा भानगडी’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण केले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. १९३० साली निळू फुले यांचा जन्म झाला. तारीख तर खुद्द निळू भाऊंना देखील आठवत नव्हती. घराची आर्थिक स्थिती अगदी बेताची होती. आई वडील आणि ११ भावंडं एवढा मोठा १३ जणांचा परिवार चालवण्यासाठी, त्यांचे वडील लहान मोठे उद्योग करायचे. मात्र त्यांना कशातच यश आले नाही.

निळू भाऊंच्या घरात चित्रपटांचे किंवा अभिनयाचे असे कोणतेच वातावरण नव्हते. मॅट्रिकपर्यंत त्यांनी त्यांचे शिक्षण केले. पुढे त्यांनी घराला हातभार लावण्यासाठी पुण्यातील आर्म फोर्स शाळेत माळी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हा त्यांचा पहिला जॉब होता. यातून त्यांना ८० रुपये पगार मिळायचा, त्यातले १० रुपये ते राष्ट्रीय सेवा दलाला दान करायचे. त्यांच्यात दानशूर वृत्ती फार आधीपासूनच होती. पुढे त्यांनी बिराजदारांच्या कथेवर आधारीत ‘भलताच बैदा झाला’ हे लोकनाट्य केले. त्यानंतर ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ अशी अनेक लोकनाट्य केली आणि ती तुफान गाजली देखील. अमृत गोरेंच्या ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. या लोकनाट्यात निळुभाऊंनी केलेली पुढाऱ्याची भूमिका तर खूपच गाजली. या लोकनाट्यात एका चित्रपट निर्मात्याने त्यांना पाहिले आणि ते खूपच प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी निळू भाऊंना त्यांच्या सिनेमात एका पुढाऱ्याची भूमिका दिली. इथूनच त्यांचा प्रवास सुरु झाला.

निळू भाऊ हे रवींद्रनाथ टागोरांच्या लेखनातून खूप प्रेरित झाले. त्यानंतर त्यांनी स्वतः ‘उद्यान’ हे नाटक लिहिले. नंतर त्यांनी “येड्या गबाळाचे काम नाही” हे नाटक देखील लिहिले आणि या नाटकांमुळे त्यांना त्यामुळे खुप प्रसिद्धी मिळाली.

यानंतर निळू फुले यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये एक क्रूर खलनायक रंगवला. काही मोजक्या चित्रपटात त्यांनी सकारात्मक भूमिका देखील केल्या आहेत. मात्र खलनायकाला ‘ब्रँड’ बनवण्याचे काम निळू भाऊंनी केले. त्यांच्या प्रभावी आणि जिवंत अभिनयाने खऱ्या आयुष्यातही महिला त्यांना स्त्रीलंपटच समजायच्या. निळू भाऊंना पाहिले की स्त्रिया निघून जायच्या. इतका मोठा प्रभाव त्यांनी त्यांच्या अभिनयाने लोकांवर पाडला. निळू फुले यांनी १२ हिंदी, तर जवळपास १४० मराठी सिनेमात अभिनय केला आहे. त्यांच्या ‘चोरीचा मामला’, ‘शापित’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यांतील भूमिका विशेष गाजल्या.

निळू फुले यांनी लोकप्रियतेच्या पलिकडे जात समाजसेवेचे व्रतही अंगिकारले. त्यांनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी १९५८ साली पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले होते. त्यांचे वडील बंधू स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. निळू फुलेंनी देखील या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला. ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे सुद्धा भागीदारी आहेत. ते पुण्याचे स्वातंत्र्यसैनिक होते.

निळू फुले यांनी ‘एक होता विदुषक’, ‘गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘पिंजरा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘माझा पति करोडपती’, ‘गोष्ट छोटी डोंगराऐवढी’, ‘जैत रे जैत’, ‘कदाचित’, ‘भुजंग’, ‘माल मसाला’, ‘हळद रूसली कुंकु हसलं’, ‘बायको असावी अशी’, ‘पुत्रवती’, ‘लक्ष्मीची पाऊले’ आदी मराठी, तर ‘औरत तेरी यही कहानी’, ‘सुत्रधार’, ‘हिरासत’, ‘सारांश’, ‘कुली’, ‘प्रेमप्रतिज्ञा’, ‘वो सात दिन’, ‘बिजली’, ‘दो लडके दोनो कडके’, ‘मशाल’, ‘तमाचा’, ‘जरासी जिंदगी’, ‘नरम गरम’, ‘सौ दिन सांस के’, ‘कब्जा’, ‘मां बेटी’, ‘पुर्णसत्य’, ‘सर्वसाक्षी’, ‘कांच की दिवार’, ‘दिशा’ आदी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

त्यांना त्यांच्या मोठ्या कारकिर्दीसाठी संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, केसरी मराठा ट्रस्ट, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे अध्याय, जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

साल २००९ पर्यंत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. १३ जुलै २००९ रोजी त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. ते अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रस्त होते.

हेही नक्की वाचा

वयाच्या २३व्या वर्षी तुटलं होतं कृष्णा श्रॉफचं हृदय; टायगर श्रॉफच्या बहिणीला आली पहिल्या प्रेमाची आठवण

भारती झालीय म्हातारी! तरीही हर्ष म्हणतोय, ‘प्रेम तर नेहमी तरुणच असते…’; व्हिडिओवर उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘…माझ्या काही अत्यंत आवडीच्या गोष्टी’, म्हणत पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली सोनाली कुलकर्णी; एक नजर टाकाच

हे देखील वाचा