बॉलिवूडमधील जेष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विरोधात मानहानीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली आहे. अख्तर यांनी मुंबईतील न्यायालयात हा अर्ज दिला आहे. २० सप्टेंबर रोजी कंगना शेवटची अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाली होती. या संपूर्ण वादात कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल केला. कंगनाने या गुन्ह्यात अख्तर यांच्यावर खंडणी, गोपनीयतेचा भंग असे अनेक आरोप केले आहेत.
अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाच्या विरोधात टेलिव्हिजन मुलाखतींमध्ये बदनामीकारक आणि निराधार टिप्पणी केल्याबद्दल फौजदारी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने डिसेंबरमध्ये उपनगरीय जुहू पोलिसांना तपास करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, हा गुन्हा घडला असून, त्यावर पुढील तपासाची गरज आहे. यावर न्यायालयाने कंगनाविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू केली आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये तिला समन्स बजावले. मात्र त्यानंतर कंगना फक्त एकदाच कोर्टात हजर झाली.

अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगना विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. कंगनाने एका टीव्ही मुलाखतीदरम्यान दिलेल्या वक्तव्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आरोप केला होता की, जावेद अख्तर फिल्म इंडस्ट्रीत दुफळी निर्माण करतात आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देतात.
अलिकडेच कंगना रणौतने स्वातंत्र्यासंदर्भात वादग्रस्त विधान करून स्वतःला वादाच्या विळख्यात अडकवून घेतले होते. तिने असे वक्तव्य केले होते की, “१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते आणि आता खरे जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते २०१४ पासून मिळाले आहे,” असे विधान करून तिने सर्वत्र खळबळ उडवून दिली. तिच्या या विधानानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. तिच्या या विधानावर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला होता.
हेही वाचा-
पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग
एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख
समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर