बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. 200 हून अधिक चित्रपटांत काम केलेल्या या लोकप्रिय अभिनेत्यावर आता कायदेशीर संकट ओढावले असून, त्यांना जेलमध्ये आत्मसमर्पण करावे लागले आहे. नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया.
चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतर राजपाल यादव (Rajpal Yadav)यांनी संबंधित जेल अधीक्षकांसमोर 4 फेब्रुवारी 2026 रोजी आत्मसमर्पण केले. यापूर्वी न्यायालयाने दिलेली सशर्त सवलत मागे घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला होता.
आत्मसमर्पण केल्यानंतर राजपाल यादव यांनी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात वैयक्तिकरित्या हजेरी लावत दिलासाची मागणी केली. त्यांनी न्यायालयाला 25 लाख रुपयांचा चेक सादर केल्याची माहिती दिली आणि उर्वरित रक्कमही लवकरच अदा करू, असे आश्वासन दिले. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की आत्मसमर्पण झाल्याशिवाय कोणतीही दिलासा देण्याचा विचार होऊ शकत नाही.
न्यायालयाने नमूद केले की, यापूर्वी दिलेल्या सर्व सवलती या प्रकरणाचा सौहार्दपूर्ण तोडगा काढून तक्रारदार कंपनीला रक्कम अदा केली जाईल या वारंवार दिलेल्या आश्वासनांवर आधारित होत्या. मात्र, अनेक संधी दिल्यानंतरही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी सांगितले की, खालच्या न्यायालयाचा निर्णय जून 2024 मध्ये केवळ प्रकरण निकाली काढण्यासाठी वेळ देण्यासाठी स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र, ठरवून दिलेल्या वेळमर्यादेत कोट्यवधी रुपयांचा भरणा झाला नाही. डिमांड ड्राफ्ट व हप्त्यांद्वारे केलेले आंशिक भुगतानही आदेशांतील वेळेत जमा झाले नव्हते.
डिमांड ड्राफ्टमधील तांत्रिक किंवा टायपिंग त्रुटींबाबत दिलेली कारणे न्यायालयाने असमाधानकारक ठरवली. न्यायालयात वरिष्ठ वकिलांमार्फत दिलेल्या स्पष्ट बांधिलकींचेही पालन न झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
वारंवार उल्लंघन आणि स्वतः जबाबदारी स्वीकारल्यानंतरही आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने, उच्च न्यायालयाने कोणताही अतिरिक्त दिलासा देण्यास नकार दिला. तसेच, रजिस्ट्रार जनरलकडे जमा असलेली रक्कम तक्रारदार कंपनीला देण्याचे आदेश देत, खालच्या न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगण्यासाठी राजपाल यादव यांनी आत्मसमर्पण करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
या प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली असून, राजपाल यादव यांना आता काही काळ जेलमध्ये राहावे लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










