2024 मध्ये एक अॅक्शन चित्रपट शांतपणे भारताबाहेरील सिनेमागृहांत प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाची घोषणा 2018 मध्ये झाली होती, कोरोना काळात त्याचे शूटिंग झाले आणि अखेर एप्रिल 2024 मध्ये तो प्रदर्शित झाला. कथा, कलाकार आणि विषय पूर्णपणे भारतीय असूनही हा चित्रपट भारतात रिलीज होऊ शकला नाही. आम्ही बोलत आहोत देव पटेल यांच्या ‘मंकी मॅन’ या चित्रपटाबद्दल.
एप्रिल 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंकी मॅन’मध्ये (Monkey Man)देव पटेल यांनी केवळ प्रमुख भूमिका साकारली नाही, तर दिग्दर्शनाची धुराही सांभाळली. या चित्रपटात 90 टक्क्यांहून अधिक कलाकार आणि क्रू भारतीय होते. कथा भारतीय समाजावर आधारित असूनही हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटातील महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेता विपिन शर्मा यांनी भारतात रिलीज न होऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हे “दुर्दैवी” असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी सांगितलं की, 2020 मध्ये महामारीच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत शूटिंग पूर्ण करण्यात आलं आणि पोस्ट-प्रोडक्शनसाठी तब्बल 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागला. संपूर्ण कास्ट आणि क्रूने जवळपास 6 महिने एका वेगळ्या बेटावर वास्तव्यास राहून शूटिंग केलं.
भारतामध्ये रिलीज न झालेला ‘मंकी मॅन’ मात्र जागतिक स्तरावर प्रचंड लोकप्रिय ठरला. सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 290 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. आयएमडीबीवर चित्रपटाला 6.8 रेटिंग मिळाली असून रॉटन टोमॅटोजवर 88% स्कोअर मिळाला आहे. मात्र, सीबीएफसीकडून मंजुरी न मिळाल्यामुळे भारतात रिलीज थांबवण्यात आला. बोर्डची मुख्य चिंता म्हणजे चित्रपटात एका धार्मिक नेत्याला खलनायकाच्या रूपात दाखवण्यात आलं असल्याचं सांगितलं जातं.
‘मंकी मॅन’ हा चित्रपट भ्रष्टाचार, गरीबी, जातीय भेदभाव आणि व्यवस्थेतील दोष यांसारख्या विषयांवर भाष्य करतो. हा चित्रपट भगवान हनुमानांच्या कथेपासून प्रेरित आहे. देव पटेल यांनी सांगितलं होतं की, हिंदू पौराणिक कथा आणि आधुनिक सुपरहिरो कथांमध्ये त्यांना साम्य जाणवतं. चित्रपटात त्यांचा पात्र बंदराचा मुखवटा घालून खलनायकांविरोधात लढताना दिसतो. कथानकात तो भ्रष्ट नेत्यांमुळे झालेल्या आईच्या मृत्यूचा बदला घेतो आणि पुढे पीडितांचा मसीहा बनतो.
या चित्रपटात देव पटेल यांच्यासोबत शोभिता धुलिपाला, सिकंदर खेर, शार्ल्टो कॉप्ले, मकरंद देशपांडे, अश्विनी कालसेकर आणि विपिन शर्मा यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. आयएमडीबीच्या माहितीनुसार, ‘मंकी मॅन’ने आतापर्यंत 11 पुरस्कार जिंकले आहेत. भारतात थिएटरमध्ये रिलीज न झालेला हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘मी ज्यासाठी काम करतो ते म्हणजे…’ ‘बॉर्डर २’ रिलीज होण्यापूर्वी ट्रोलिंगवर बोलला वरुण धवन










