झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील ‘नंदिता वहिनीसाहेब’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ‘वहिनीसाहेब’ आता ‘आईसाहेब’ झाल्या आहेत. धनश्रीने स्वत: ती आई झाल्याची बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे.
धनश्रीच्या घरी एका गोंडस मुलाचे आगमन झाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा धनश्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सोबतच बाळ आणि ती सुखरूप असल्याचे देखील तिने सांगितले आहे. ‘New life…New chapter’ असे कॅप्शन देत धनश्रीने लिहिले, “ही गोड बातमी तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होत आहे. आज पहाटे आमच्या घरी एका गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. माझी आणि बाळाची दोघांचीही प्रकृती स्वस्थ आहे. आम्हाला खूप प्रेम, आशीर्वाद सर्व काही दिल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद”.
धनश्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसोबतच कलाकारांकडूनही भरभरून शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळत आहे.
तत्पूर्वी धनश्रीने तिच्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ही गोड बातमी सर्वांसोबत शेयर केली होती. प्रेग्नंसीच्या काळात धनश्री प्रचंड ऍक्टिव्ह होती. नेहमी ती तिचे प्रेग्नंसीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायची. धनश्रीने तिचे प्री मॅटर्निटीचे असंख्य फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय तिचे तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो देखील खूप वायरल झाले होते. २०१३ मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्न केले होते. तिने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.










