सध्या मराठी मनोरंजनविश्वात फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे, आणि तो सिनेमा म्हणजे ‘धर्मवीर’. प्रसाद ओक अभिनित या सिनेमाने प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बज निर्माण केला आहे. अगदी सिनेमाच्या टीझरपासूनच्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला असल्याने चित्रपटाबद्दल सर्वच लोकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या ट्रेलरची किंबहुना या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रसाद ओकचा अतिशय जिवंत आणि प्रभावी अभिनय. ट्रेलरमधून प्रसाद ओकने पडद्यावर अक्षरशः आनंद दिघे या व्यक्तिमत्वाला जिवंत केले आहे. बाळासाहेब दैवत असणाऱ्या आनंद दिघे यांनी ठाण्यातील लोकांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आयुष्यभर कष्ट केले. ठाण्यात खऱ्या अर्थाने शिवसेना मोठी करण्याचे श्रेय आजही केवळ आणि केवळ आनंद दिघे यांना दिले जाते. अतिशय साधी राहणी असलेल्या आनंद दिघे यांनी आपल्या करारीपणामुळे आणि शिवसेनेच्या खाक्यामुळे समाजातील वाईट लोकांवर चांगलाच जरब बसवला. या सर्वच गोष्टींचे दर्शन या सानमच्या ट्रेलरमधून घडताना दिसते.
ठाण्यात आनंद दिघे यांच्यावर लोकांची एवढी श्रद्धा होती की, त्यांच्या एक वेगळाच दरबार किंबहुना प्रतिन्यायालय भरायचे. कोर्टाच्या निकालापेक्षा जास्त विश्वास लोकांचा दिघे साहेबांवर होता. एकीकडे मुस्लिमांविरोधात लढणारे आनंद दिघे आणि दुसरीकडे सर्व धर्माना सामान वागणूक देणारे आनंद दिघे अशा दोन्ही दिघे साहेबांचे दर्शन या ट्रेलरमधून प्रेक्षकांना घडते. ठाण्यात देवांच्या जागी दिघे साहेबांना पुजले जायचे. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक किलोमीटर उभे राहून राखी बांधणाऱ्या महिला देखील यात दिसल्या.
या ट्रेलरनंतर नक्कीच या सिनेमाने मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मनात आतुरता निर्माण केली असून, आता सर्वांचं सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठे करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा ‘धर्मवीर’ सिनेमा आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती केली आहे. प्रवीण तरडे यांनी सिनेमाचं लेखन- दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-