[rank_math_breadcrumb]

बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवरही रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा जलजला; अवघ्या 1 दिवसात नेटफ्लिक्सवर नंबर 1

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला रणवीर सिंह स्टारर चित्रपट ‘धुरंधर’ 5 डिसेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित झाला होता. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जगभरात या चित्रपटाने 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

सिनेमागृहांत धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘धुरंधर’ नेटफ्लिक्सवरही रिलीज झाला आहे. 30 जानेवारीच्या मध्यरात्री हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि अवघ्या 24 तासांतच नेटफ्लिक्स इंडियावर नंबर 1 ट्रेंडिंग ठरला. 31 जानेवारीपर्यंत हा चित्रपट अव्वल स्थानावर पोहोचला असून, अजूनही तो नेटफ्लिक्सवर आपली मजबूत पकड कायम ठेवून आहे.

सिनेमाहॉलमध्ये प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ‘धुरंधर’चा आनंद घेतला. दमदार कथा, भव्य मांडणी आणि देशभक्तीची भावना यामुळे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक घरबसल्या आपल्या लिव्हिंग रूममध्ये या चित्रपटाचा थरार अनुभवत आहेत. सोशल मीडियावरही अनेकांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

धुरंधर’च्या (Dhurandhar) कमाईबाबत बोलायचे झाले तर, 31 जानेवारी 2026 पर्यंत भारतात 836.5 कोटी रुपये, तर जगभरात 1302.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने ओपनिंग डे ला 28 कोटींची कमाई केली होती. पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने सिनेमागृहांत 58 दिवसांपर्यंत मजबूत कामगिरी केली. 58व्या दिवशीही चित्रपटाने 4 लाखांची कमाई केली.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून त्यांनी ‘हमजा’ नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.

दरम्यान, या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘धुरंधर 2’ 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा