Friday, April 26, 2024

सुपरस्टार दिलीप कुमार यांच्याबद्दल समोर येतेय मोठी बातमी, अभिनेत्याला हॉस्पिटलमधून मिळालाय डिस्चार्ज

कोरोनामुळे सगळीकडेच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या वाईट परिस्थितीत, बॉलिवूडलाही मोठ्या  प्रमाणात याचा धक्का बसत आहे. अशातच एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे .९८वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नियमित तपासणी व चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

माध्यमाशी बोलताना सायरा बानो म्हणाल्या की, ‘डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते आणि त्यानंतर त्यांना जिकडे कोविड विभाग नाही, अश्या खारमधील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची दर महिन्यात होणारी नियमित तपासणी करण्यात आली. बाकी त्यांना काही अडचण नाही. त्यांची प्रकृती चांगली आहे.’

सायरा  बानो पुढे म्हणाल्या की, ‘गेल्या दोन दिवसांत त्यांच्या सर्व चाचण्या व तपासणी पूर्ण झाल्या आहेत आणि आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या सर्व चाहत्यांचे आभार. तुमच्या प्रार्थनांमुळेच दिलीप साहेब स्वस्थ आहेत.’

दिलीप कुमार यांनी अलीकडेच आपल्या अधिकृत ट्विटरवरून, कोरोना साथीच्या वाढत्या फैलावामुळे सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितले होते. त्यांनी लिहिले- “सर्व नागरिकांनो,  सुरक्षित रहा.”

दिलीप कुमार हे बरेच दिवस सोशल मीडियावर सक्रिय नाहीयेत. त्यांनी शेवटचे ट्विट २६ मार्च रोजी केले होते. गेल्या वर्षी कोरोनाची सुरवात झाली होती, तेव्हा सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांची काळजी घेण्यासाठी, सगळ्यांपासुन त्यांना दूर केले होते. तेव्हापासुन सायरा बानो या दिलीप कुमार यांची संपूर्ण काळजी घेत आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिलीप कुमार, यांनी कोविडमुळे आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. त्याचबरोबर सायरा बानो यांनी दरवर्षीप्रमाणे या निमित्ताने गरजू लोकांना दान केले होते.

एका मुलाखतीत सायरा बानो म्हणाल्या होत्या की, ‘दिलीप कुमार त्यांच्यासाठी काळजाचा तुकडा आहे. मी आजही दिलीप साहेबांची नजर उतरवत असते, दिलीप साहेब माझ्यासाठी माझ्या हृदयाचे ठोके आहेत. दिलीप साहेबांना स्पर्श करणे आणि त्यांच्याकडे सतत बघत राहणे, हा माझ्यासाठी जगातील सगळ्यात मोठा आनंद आहे . मी त्यांना आयुष्यभर असे पाहू शकते. ते माझा श्वास आहेत.’

हे देखील वाचा