Monday, April 21, 2025
Home अन्य ईश्वरी स्वर निनादाने दुमदुमला आसमंत! ‘दोन भारतरत्न’मधून पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना स्वरांजली

ईश्वरी स्वर निनादाने दुमदुमला आसमंत! ‘दोन भारतरत्न’मधून पंडित भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना स्वरांजली

‘बाजे रे मुरलीया’, ‘इंद्रायणी काठी’, ‘काया ही पंढरी’, ‘विठ्ठलाच्या पायी’, अशी भक्तिमय भजने, तर ‘जा रे बदरा’, ‘भय इथले संपत नाही’, ‘सुनो सजना’, ‘आयेगा आनेवाला’, ‘नाम गुम जायेगा’, ‘लग जा गले’, अशा अजरामर गाण्यांतून निनादलेल्या ईश्वरी स्वरांनी आसमंत दुमदुमला. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Pandit Bhimsen Joshi) आणि भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना ‘दोन भारतरत्न’ या अनोख्या कार्यक्रमातून स्वरांजली अर्पण करण्यात आली.

निमित्त होते, मनीषा निश्चल्स ‘महक’ निर्मित, गेट सेट गो प्रस्तुत आणि आदिमा कॉन्सर्ट्स अँड इव्हेंट्स आयोजित ‘दोन भारतरत्न’ या भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला समर्पित कार्यक्रमाचे! भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या (भांडारकर इन्स्टिट्यूट) नवलमल फिरोदिया प्रेक्षागृहात शनिवारी ही स्वरमैफल रंगली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांचे ओघवते निवेदन व आठवणी, चैतन्य कुलकर्णी आणि मनीषा निश्चल यांचे मंत्रमुग्ध करणारे गायन आणि प्रसन्न बाम, यश भंडारे, अपूर्व द्रविड, निलेश देशपांडे, विशाल गंड्रतवार, उद्धव कुंभार या वाद्यवृंदाची साथसंगत यामुळे श्रोत्यांना स्वरानुभूती घेता आली.

‘रम्य ही स्वर्गाहून’, ‘राम का गुणगान’, ‘रहे ना रहे हम’, ‘पिया तोसे’, ‘सखी मंद झाल्या’, ‘सूर येती विरून जाती’, अशा अवीट मेलेडीयस गाण्यांचे सादरीकरण झाले. ज्येष्ठ नेते आबा बागुल, माधवी वैद्य, महेश सुर्यवंशी, किशोर सरपोतदार, ऋषिकेश सोमण, आनंद सराफ, संजीव वेलणकर यांच्यासह गेट सेट गोचे अमित कुलकर्णी, ‘आदिमा’चे रवींद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.

तत्पूर्वी, ‘दोन भारतरत्न’च्या निमित्ताने कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला. आनंद देशमुख, मनीषा निश्चल, चैतन्य कुलकर्णी व निश्चल लताड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील संकल्पना, स्वरूप व आगामी काळातील या दोन्ही रत्नांच्या रचनांचे सादरीकरण याविषयी माहिती दिली. आनंद देशमुख म्हणाले, “भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर ही दोन्ही रत्ने ईश्वरी स्वर आहेत. त्यांची गाणी, आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. या कार्यक्रमातून पंडितजी व लतादीदी यांची भजने, भावगीते, सुगम संगीत आणि शास्त्रीय-निमशास्त्रीय गायन श्रोत्यांना अनुभवता येणार आहे.” या दोन्ही आदर्शांना समोर ठेवून अनेक कलाकार आपली सांगीतिक सेवा करत आहेत. यातून त्यांना अभिवादन करण्याचा प्रयत्न असून, भारतासह जगभर याचे प्रयोग व्हावेत, अशी इच्छा असल्याचे मनीषा निश्चल यांनी यावेळी सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा