ऑस्कर! अमेरिकेतील चित्रपटसृष्टीचा अकादमी पुरस्कार! जगभरातील प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्नं असतं, की एकदातरी आयुष्यात हा पुरस्कार मिळवावा. संपूर्ण जगभरातील सिनेसृष्टीचं आकर्षण म्हणजे हा पुरस्कार असतो.
१६ मे, १९२९ साली पहिल्यांदा हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये २७० जणांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. १९५३ मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पहिल्यांदा दुरचित्रवाणीवर म्हणजेच आपल्या टीव्ही वर प्रसारित केला गेला. आणि या पुरस्कार सोहळ्याचं गारुड जगभर पसरलं.
भारतात देखील या पुरस्कारांविषयी खूप कुतूहल आहे. आपल्याला ठाऊक आहे का एकही भारतीय सिनेमा आजपर्यंत ऑस्कर पुरस्कार जिंकलेला नाही. १९८३ साली गांधी सिनेमासाठी भानू अथैय्या (वेशभूषाकार) या पहिल्या ऑस्कर विजेत्या भारतीय ठरल्या. ज्येष्ठ दिग्दर्शक, चित्रपती सत्यजित रे यांना अकादमी पुरस्कारांतर्फे १९९२ साली जीवनगौरव ऑस्कर देण्यात आला. यानंतर गुलजार, ए. आर. रेहमान, रेसुल पुकुट्टी यांनी स्लमडॉग मिलेनियर या सिनेमासाठी ऑस्कर जिंकला होता. या सर्वांनी वैयक्तिकरित्या हा पुरस्कार जिंकलेला आहे.
आपल्याला ठाऊक आहे का की या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट या विभागात भारताने १९५८ सालापासून अनेक चित्रपट पाठवले आहेत. परंतु यात अंतिम पाच सिनेमांच्या यादीत फक्त तीनच सिनेमे पोहोचू शकले होते. मदर इंडिया, लगान आणि सलाम बॉम्बे!
मग आपल्याला प्रश्न पडला असेल की आजपर्यंत भारतातर्फे एकही मराठी सिनेमा पाठवला गेला नाही का? तर आपल्याला सांगायला आवडेल की आतापर्यंत तीन सिनेमांनी ही मजल मारली आहे. भारतातर्फे आजपर्यंत तीन मराठी सिनेमे ऑस्करसाठी पाठवले होते. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट. परंतु दुर्दैवाने एकही सिनेमा अंतिम पाच सिनेमांच्या यादीत पोहचू शकला नाही. का भारतातर्फे हे सिनेमे ऑस्कर करीत पाठवले गेले होते यावर एक नजर आपण टाकूयात.
१. श्वास (२००४)
२००४ साली या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मराठी सिनेसृष्टीने पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने ‘श्वास’ घेण्यास सुरुवात केली असं म्हणता येईल. कोकणातल्या एक लहान मुलाला कॅन्सर सारखा आजार होतो, डोळे काढल्याने तो वाचणार असतो, त्याची दृष्टी जाण्याअगोदर त्याला हे सुंदर जग दाखवण्यासाठी त्याचे आजोबा काय काय कसरत करतात, ही एकंदरीत कथा आहे. आणि हे उत्कृष्ट पद्धतीने मांडण्यात दिग्दर्शक संदीप सावंत यशस्वी ठरले आहेत आणि सिनेमातील कलाकारांचा अभिनय हीच या सिनेमाची जमेची बाजू ठरते. आणि म्हणूनच हा सिनेमा भारतातर्फे २००४ साली ऑस्करसाठी पाठवण्यात आला. खूप मेहनत आणि सामान्यांच्या आर्थिक पाठपुराव्यानंतरही ह्या सिनेमाला अंतिम पाच सिनेमांमध्ये क्रमांक पटकवण्यात थोडक्यात अपयश आलं आणि मराठी सिनेसृष्टीचं तसेच भारतीय सिनेसृष्टीचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं. असं जरी असलं तरी देखील ह्या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली यात काहीच शंका नाही. ६० लाख रुपयांमध्ये बनलेल्या या सिनेमाने पुढे २ कोटी १४ लाखाचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला होता.
२. हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)
या सिनेमाबद्दल बोलावं तितकं कमीच… एक तर हा सिनेमा बनवणारे परेश मोकाशी यांचा हा पहिलाच चित्रपट, त्यातही सिनेमाची कथा काय तर दादासाहेब फाळके यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आणि जिद्दीने राजा हरिश्चंद्र हा सिनेमा बनवला. केवढं ते धारिष्ट्य! परंतु त्यांचं हेच धारिष्ट्य त्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन गेलं. कारण हा सिनेमा २००९ साली भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला जाणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला. मराठी सिनेसृष्टीची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचावली. त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण हे राष्ट्रीय पुरस्कार देखील या सिनेमानं पटकावले. सोबतच अनेक फिल्म फेस्टिव्हल्स मध्ये या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे पुरस्कार देखील मिळवले. फक्त इतकंच नाही तर २ कोटींमध्ये बनवल्या गेलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटींचा गल्ला देखील जमवला.
३. कोर्ट(२०१५)
ह्या सिनेमाने मराठी माणसाच्या शिरपेचात जो मनाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल बोलावं तितकं कमीच! परेश मोकाशी यांच्याप्रमाणेच युवा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा सुद्धा हा पहिलाच सिनेमा! परंतु सिनेमा पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की भल्या भल्या दिग्दर्शकांना जमलं नाही ते या तरुण दिग्दर्शकाने साकारलं आहे. एक लोक कलावंत त्याच्या नकळत एका केसमध्ये अडकवला जातो आणि त्यानंतर नायलयात जे नाट्य घडतं ही या सिनेमाची कथा आहे. ही कथा या तरुण दिग्दर्शकाने इतक्या उत्तम पद्धतीने रुपेरी पडद्यावर मांडली की त्यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जिंकून सुवर्णकमळ मिळवलं. इतकंच नाही तर त्या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठविण्यात आलेला हा तिसरा मराठी चित्रपट ठरला. अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्स मध्ये या सिनेमाने नाव कमावलं. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आणि जागतिक सिनेमामध्ये मराठी सिनेमाची ख्याती सातासमुद्रापलीकडे पसरवली. एक जमेची बाजू म्हणजे या सिनेमात कोणताही नावाजलेला नट काम करीत नव्हता. या सिनेमामध्ये काम केलेल्या एकही कलाकाराला मानधन देण्यात आलं नव्हतं. आणि तरीही या सिनेमाने आणि दिग्दर्शकाने फिनिक्स भरारी घेतली.