दु:खद! अमिताभ बच्चनसोबत चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद राठोड यांचे निधन


मनोरंजनसृष्टीसाठी गेले काही दिवस खूपच वाईट आहेत. अनेक वाईट बातम्या सतत कानावर येत आहेत. राज कौशल यांच्या निधनाला दोन दिवसही होत नाहीत, तोवर अजून एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले गुजराती अभिनेते अरविंद राठोड यांचे १ जुलै रोजी दुःखद निधन झाले.

अरविंद हे मागील काही वर्षांपासून खूप आजारी होते आणि सोबतच काही महिन्यांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह देखील झाले होते. त्यामुळे ते खूप अशक्त झाले होते. तेव्हापासून ते अंथरुणावर पडूनच होते. अखेर वयाच्या ८३ वर्षी त्यांनी हे जग सोडले. अरविंद यांनी लग्न केले नव्हते. त्यामुळे ते त्यांच्या भावाच्या कुटुंबासोबत राहत होते.

अरविंद यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांचा अतिशय हिट सिनेमे असलेले ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केल्यानंतर त्यांनी मुंबई देखील सोडली होती आणि ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. अभिनयात येण्यापूर्वी ते एक फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करायचे.

अरविंद राठोड यांनी आजपर्यंत २५० चित्रपटांमध्ये काम केले. अरविंद यांनी १९६८ साली ‘द लेडी किलर’ चित्रपटात काम केले होते. सोबतच त्यांनी ‘भादर तारा वहता पानी’, ‘सोन कंसारी’, ‘गंगा सती’, ‘माँ खोदल तारो खामकरो’ आदी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.