बॉलिवूडमधील अभिनेत्री अनेकदा कॉस्मेटिक प्रोसिजर, बोटॉक्स आणि प्लास्टिक सर्जरीबाबत चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील काही अभिनेत्रींनी उघडपणे ब्यूटी ट्रीटमेंट्सचा स्वीकार केला आहे, तर काहींनी हे आरोप कायम नाकारले आहेत. अशातच दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ‘नैसर्गिक सौंदर्य’ आणि कॉस्मेटिक ट्रेंडवर चर्चा रंगली आहे.
फराह खान (Farah Khan)आपल्या अलीकडील व्लॉगमध्ये एका स्किन केअर प्रॉडक्टचे प्रमोशन करत होती. यावेळी तिचा कुक दिलीप तिच्या ग्लोइंग स्किनचे कौतुक करतो. त्यावर फराह आधी लाजते आणि मग गंमतीशीरपणे म्हणते,
“दिलीपला वाटू दे की मी नैसर्गिकरित्या सुंदर आहे. पण ऐश्वर्या रायला वगळता बॉलिवूडमध्ये फारसं कुणी नैसर्गिक सुंदर असेल असं मला वाटत नाही.”
फराह खानचं हे विधान सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झालं. त्यानंतर अनेक युजर्सनी ऐश्वर्या रायची तुलना आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबत करत चर्चेला उधाण आणलं.
फराह खानने यूट्यूबवर पाऊल ठेवल्यापासून तिच्या व्लॉग्सना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून ती व्लॉगिंग करत असून, तिची आणि कुक दिलीपची गंमतीशीर नोकझोक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
फराहच्या व्लॉगमध्ये आतापर्यंत अर्पिता खान, जॅकी श्रॉफ, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, रिद्धिमा कपूर साहनी, हंसिका मोटवानी, हिमेश रेशमिया, अमीषा पटेल आणि श्रुती हासन यांसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.
ऐश्वर्या रायने 1994 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘ताल’, ‘देवदास’, ‘गुरु’, ‘मोहब्बतें’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘जोधा अकबर’, ‘जोश’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे. शेवटची ती 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियन सेलवन: II’ या चित्रपटात दिसली होती. फराह खानच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील सौंदर्याच्या संकल्पनेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


