Saturday, June 29, 2024

बॉलिवूडमधील बापमाणसं! ज्यातील काहींनी मुलींना बनवले यशस्वी, तर काहींनी लावली आयुष्याची वाट

वडील… हा शब्द प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खूपच महत्त्वाचा आहे. वडील आपल्या मुलांसाठी परिस्थितीनुसार ढाल बनून उभा राहत असतो. आपल्या पोटाला चिमटा काढून वडील आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी झगडत असतो. शिस्त, त्याग, धैर्य या सर्वांसाठी एक शब्द वापरायचा झाल्यास, वडील हा एक शब्द पुरेसा आहे. जर आई मुलाला लहानाचं मोठं करत असेल, तर वडील आपल्या मुलाला जगायचं कसं हे शिकवतो. आई आपल्या मुलांसमोर तिचं दु:ख व्यक्त करते. मात्र, वडील तेच दु:ख कधीच व्यक्त करत नाही. वडिलांच्या खांद्यावर भरमसाठ जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. कदाचित हे कधीही शब्दांत मांडता येणार नाही. तसं पाहिलं, तर वडिलांसाठी कोणताही खास दिवस साजरा करण्याची गरज नाही. मात्र, जगात जून महिन्याचा तिसरा रविवार पितृदिन म्हणून साजरा केला जातो. या खास क्षणी आपण बॉलिवूडमधील त्या सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये वडिलांचे कठोर रूप पाहायला मिळाले आहे.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) हा सिनेमा सन १९९५मध्ये रिलीझ झाला होता. या सिनेमात शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी आणि अनुपम खेर यांच्या भूमिका होत्या. या सिनेमात अमरीश पुरी हे काजोलच्या वडिलांच्या भूमिकेत होते. दुसरीकडे, अनुपम खेर यांनी शाहरुख खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सिनेमात अमरीश हे संस्कारी वडील बलदेव सिंग यांच्या भूमिकेत होते. जेव्हा बलदेव सिंग यांना समजते की, सिमरन आणि राज हे एकमेकांशी प्रेम करतात, तेव्हा ते सिमरनला घेऊन आपल्या देशात परततात. त्यानंतर राजदेखील सिमरनकडे येतो. जेव्हा बलदेव सिंग यांना समजते की, दोघेही एकमेकांशी खूप प्रेम करतात, तेव्हा ते सिमरन आणि राज यांच्या प्रेमाला हिरवा कंदील दाखवतात.

मोहब्बतें
सन २००० मध्ये आलेल्या मोहब्बतें (Mohabbatein) या सिनेमाचेही असेच काहीसे आहे. या सिनेमात शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका होते. यामध्ये अमिताभ हे एका कॉलेजमधील शिस्तप्रिय आणि कडक प्राचार्यांच्या भूमिकेत असतात. त्यांना त्यांच्या मुलीचे शिक्षकाशी प्रेम करणे आवडत नाही. मुलीला आपल्या वडिलांना दु:खी पाहायचे नसते, त्यामुळे ती आत्महत्या करते. मात्र, बऱ्याच काळानंतर प्राचार्यांना मुलीचा प्रेमी, प्रेमाचा अर्थ समजून सांगतो.

दंगल
जगभरात गाजलेला २०१६ सालचा ‘दंगल’ (Dangal) हा सिनेमा या यादीत सामील आहे. या सिनेमात सुपरस्टार आमिर खान याने कठोर वडिलांची भूमिका साकारली होती, जो आपल्या मुलींना कुस्ती शिकवण्यासाठी खूपच आग्रही तसेच कडक असतो. मुलींना कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी तो वाटेल त्या थराला जातो. हा सिनेमा कुस्तीपटू महावीर फोगाट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमाला फिल्मफेअरचा सर्वोत्तम सिनेमाचा पुरस्कारही मिळाला होता.

सूर्यवंशम
दिनांक २१ मे, १९९९ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन आणि सौंदर्या यांच्या ‘सूर्यवंशम’ (Sooryavansham) सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. सिनेमात अमिताभ हे वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिकेत होते. त्यांनी एका कठोर वडिलांची भूमिका साकारली होती. ‘सूर्यवंशम’ सिनेमाची गणना ग्रामीण भागात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या सिनेमांमध्ये होते.

मुघल-ए-आझम
पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला अभिनित हा क्लासिक सिनेमा १९६०मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी रूढीवादी वडिलांची भूमिका साकारली होती. सिनेमात सम्राट अकबर (पृथ्वीराज कपूर) यांचा मुलगा सलीम (दिलीप कुमार) त्याची दरबारी नृत्यांगना अनारकली (मधुबाला) हिच्या प्रेमात पडतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे पडतात. सलीमचे अनारकलीशी असलेले नाते अकबरला अजिबात आवडत नसते. यावरून पिता-पुत्रांमध्ये जोरदार भांडण होते. पुढे अकबर हे अनारकलीला भिंतीमध्ये निवडतो आणि इथून त्यांचे नाते संपुष्टात येते.

हे देखील वाचा