Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड रोहित शेट्टी यांच्या घरावर फायरिंग प्रकरणात पाच आरोपी अटक, पोलिस तपासात मोठा खुलासा

रोहित शेट्टी यांच्या घरावर फायरिंग प्रकरणात पाच आरोपी अटक, पोलिस तपासात मोठा खुलासा

मुंबईच्या जुहू परिसरात चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुंबई पोलिसांची अँटी एक्स्टॉर्शन सेल (AEC) आणि क्राइम ब्रँच यांच्या तपासात हा हल्ला पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले असून, यामागे पुण्यापासून मुंबईपर्यंत सक्रिय असलेले संपूर्ण नेटवर्क कार्यरत होते.

या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये
स्वप्निल बंडू सकट (23), समर्थ शिवशरण पोमाजी (19), सिद्धार्थ दीपक येनपुरे (19), आदित्य ज्ञानेश्वर गायकी (19) आणि शस्त्रसाठा पुरवणारा आसाराम श्रीरंग फासले उर्फ बाबू (42) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पुण्याच्या विविध भागांतील रहिवासी आहेत.

31 जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे 12.45 वाजता रोहित शेट्टी (Rohit Shetty)यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर इमारतीसमोर अज्ञात व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला. त्या वेळी रोहित शेट्टी घरीच उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांचे खासगी सुरक्षारक्षक आणि घटनास्थळी तैनात पोलीस सतर्क झाले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळा जॅकेट आणि पांढरी पँट घातलेला आरोपी पिस्तुलातून पाच राऊंड फायरिंग करताना आणि नंतर स्कूटरवरून पळून जाताना स्पष्ट दिसतो. घटनेनंतर जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास AEC कडे सोपवला.

तपासात समोर आले की, गुन्ह्यात वापरलेली होंडा डिओ स्कूटर पुण्याहून आणण्यात आली होती. ही स्कूटर नंतर विले पार्ले परिसरात बेवारस अवस्थेत सापडली. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकाने पाच रिकामे काडतूस आणि काचेचे तुकडे जप्त केले.

तसेच आरोपींकडून एक पिस्तूल, तीन मॅगझिन, एक एअरगन आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी घटनेपूर्वी संवादासाठी Signal अ‍ॅपचा वापर केला आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट डिलीट केली.

तपासात उघड झाले आहे की, या संपूर्ण कटामागे फरार आरोपी शुभम रामेश्वर लोणकर याचा हात आहे. त्याच्याच सूचनेनुसार शूटरला स्कूटर, शस्त्रे आणि आर्थिक मदत पुरवण्यात आली. सध्या शुभम लोणकर आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारा शूटर फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत आहेत.

तसेच अटक आरोपी स्वप्निल सकट यांच्या घरातून जप्त शस्त्रे आसाराम फासले याने शुभम लोणकरच्या सांगण्यावरून पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याच आधारावर 5 फेब्रुवारी रोजी आसाराम फासले याला अटक करण्यात आली.

गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. या पोस्टमध्ये आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित गुन्हेगारांची नावे असल्याचा उल्लेख आहे. याबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणातील तपास सुरू असून, रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारामागील संपूर्ण कट उघड करण्याच्या दिशेने पोलिसांची कारवाई वेगाने सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

कॅन्सरशी झुंज देताना प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा

हे देखील वाचा