मागील काही महिन्यांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार्सचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. या बिग बजेट सिनेमांकडून भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे सपशेल आपटले. कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेले हे सिनेमे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिले नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी निर्मात्यांचा हिरमोड केला. मात्र, असे असले, तरीही चित्रपटगृहात प्रदर्शित फ्लॉप ठरलेले हेच सिनेमे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुफान लोकप्रियता मिळवत आहेत.

रनवे ३४
अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याचा ‘रनवे ३४’ (Runway 34) हा सिनेमा ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला होता. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येताच नेटकऱ्यांकडून या सिनेमाला चांगली पसंती मिळत आहे. अनेक युजर्स ट्वीट करत सिनेमा कसा वाटला, हे सांगत आहेत. ‘रनवे ३४’ हा सिनेमा २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा फार काही चालू शकला नाही. सिनेमाने ३२ कोटी रुपयांचीच कमाई केली. यामध्ये अजय देवगणव्यतिरिक्त, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या.

जर्सी
सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचाही या यादीत समावेश आहे. त्याचा ‘जर्सी’ (Jersey) हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला खरा, पण प्रेक्षकांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे हा सिनेमा फ्लॉप ठरला. समीक्षकांनी सिनेमाची प्रशंसा केली होती, पण तरीही प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले नाहीत. हा सिनेमा २१ कोटींच्या आसपास कमाई करू शकला. मात्र, नेटफ्लिक्सवर येताच या सिनेमाला चाहत्यांनी पसंती दर्शवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) 

अनेक
अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) याचा ‘अनेक’ (Anek) हा सिनेमा याच महिन्यात २६ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले होते. हा सिनेमा ओटीटीवर येताच सर्वांचे लक्ष वेधले गेले. मात्र, चित्रपटगृहात या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली नाही. हा सिनेमा २७ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने फक्त ७.५० कोटी रुपयांची कमाई केली होती.

जयेशभाई जोरदार
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याचा ‘जयेशभाई जोरदार’ (Jayeshbhai Jordaar) हा सिनेमा १३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. १७.५० कोटींचा गल्ला जमवून हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. मात्र, प्राईम व्हिडिओवर आल्यानंतर प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला.

अटॅक पार्ट-१
डॅशिंग अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याचा ‘अटॅक पार्ट-१’ हा सिनेमा १ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फक्त १५ कोटींची कमाई करता आली होती. २७ मे रोजी झी५ वर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. तसेच, अनेकांनी याच्या विषयाची आणि व्हिज्युअल्सची प्रशंसा केली.

झुंड
सर्वांच्या नजरा टिकून राहिलेला सिनेमा म्हणजे ‘झुंड’ (Jhund) हा होता. ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हा सिनेमा फक्त १७ कोटींच्या आसपास कमाई करू शकला. त्यानंतर हा सिनेमा झी५वर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षक अमिताभ यांचा अभिनय पाहून हैराण झाले होते. विशेष म्हणजे, या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-