बॉलीवूडमध्ये पाऊल टाकणाऱ्या बहुतांश कलाकारांना लहानपणापासूनच आपल्या करिअरबाबत स्पष्टता असते. अनेकांनी तर चांगलं शिक्षण आणि स्थिर करिअर बाजूला ठेवून अभिनयाचा कठीण मार्ग निवडला आणि प्रचंड संघर्षानंतर इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे बिपाशा बसू.
आज, 7 जानेवारी, बिपाशा बसू (Bipasha Basu)आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी तिच्या आयुष्यातील एक भन्नाट किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनय करताना बिपाशा थेट रुग्णालयात पोहोचली होती आणि नाटक करता-करता तिचं खरंच ऑपरेशन झालं होतं. या घटनेचा खुलासा खुद्द बिपाशाने लोकप्रिय शो मध्ये केला होता.
या शो मध्ये बोलताना बिपाशाने आपल्या शालेय आयुष्यातील गंमतीशीर आठवणी शेअर केल्या होत्या. ती शाळेत खूपच खोडकर होती आणि अनेकदा मुलांना मारहाणही करत असे. इतकंच नाही तर तिला शाळेत ‘लेडी गुंडा’ असंही म्हटलं जायचं. बिपाशा इतकी धाडसी होती की ती आपल्या सीनियर्सनाही मारायची. याच काळात तिने पहिल्यांदा अभिनय केला, तोही परीक्षेतून वाचण्यासाठी. पण हाच अभिनय तिच्यासाठी धोकादायक ठरला आणि ती थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
या घटनेबाबत बिपाशा म्हणाली होती, “मी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होते आणि वर्गात नेहमी पहिली यायचे. मला दुसरा क्रमांक अजिबात आवडायचा नाही. माझ्या गणिताच्या प्री-बोर्ड परीक्षेची तयारी झाली नव्हती, म्हणून मी बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं. आई, नातेवाईक सगळे घाबरले आणि मला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच अपेंडिसायटिसचं ऑपरेशन करायचं ठरवलं. मी खूप ओरडले, पण कुणी ऐकलं नाही आणि माझं खरंच ऑपरेशन झालं.”
बिपाशा बसूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. 1996 मध्ये सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकून तिने ग्लॅमर विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या.
2001 मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. 2002 मधील ‘राज’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि इथूनच तिच्या करिअरला खरी गती मिळाली. पुढे तिने ‘जिस्म’, ‘नो एंट्री’, ‘ऐतराज’, ‘रेस’, ‘फिर हेरा फेरी’, ‘राज 3’, ‘रेस 2’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं. आजही बिपाशा बसू तिच्या बोल्ड अभिनय, फिटनेस आणि वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
दीर्घ काळानंतर कंगना रनौतची मोठ्या पडद्यावर पुनरागमन, देशभक्तीपर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात










