साल २०२० या वर्षाने कलाक्षेत्राचं फार मोठं नुकसान केलं आहे. बॉलिवूडमधील इरफान खान, ऋषी कपूर यांच्यासारखे दिग्गज आपल्याला याच वर्षी सोडून गेले तर बॉलीवूडप्रमाणेच मालिकाक्षेत्रासाठी देखील हे वर्ष तितकंच वाईट ठरलं आहे. यावर्षी मालिकाक्षेत्रानेही अनेक दिग्गज कलाकारांना गमावलं आहे. आता प्रेक्षकांकडे फक्त या कलाकारांच्या आठवणी आहेत. आपण मालिका क्षेत्रातील अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत जे यावर्षी आपल्यातून कायमचे निघून गेले आहेत.
दिव्या भटनागर
अभिनेत्री दिव्या भटनागर यांचं ७ डिसेंबर रोजी कोरोनामुळे निधन झालं. त्यांच्या खास मैत्रीण देवोलीना भट्टाचार्य यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ऑक्सिजनची पातळी ७५पेक्षाही कमी झाल्यामुळे दिव्या यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र, दिव्या यांचं शरीर उपचारांना काहीच प्रतिसाद देत नसल्याने काही काळातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांनी ये रिश्ता क्या कहलाता है, सेठजी, विष अशा काही मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मृत्यूसमयी त्या फक्त ३६ वर्षांच्या होत्या.
समीर शर्मा
प्रख्यात टीव्ही अभिनेते समीर शर्मा यांनी मुंबईच्या मालाड मधील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर शर्मा ४४ वर्षांचे होते. समीर ‘ये रिश्ता है प्यार के’ मालिकेमध्ये शौर्य माहेश्वरीची भूमिका साकारत होते. याशिवाय ते लेफ्ट राईट लेफ्ट, कहानी घर घर की, ज्योति इस प्यार को क्या नाम दू यासारख्या बर्याच हिट टीव्ही मालिकांमधून झळकले होते.
सचिन कुमार
अक्षय कुमारचा चुलत भाऊ आणि ‘कहानी घर घर की’ फेम अभिनेता सचिन कुमार याचं मे २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. घरातील सदस्यांना तो मृत अवस्थेत बेडवर पडलेला आढळला. मृत्यूसमयी तो फक्त ४२ वर्षांचा होता.
आशिष रॉय
आशिष रॉय यांचे २४ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झालं. आशिष रॉय बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अखेरीस, किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर लोकांना मदत करण्याचे आवाहनही केलं होतं. काही कलाकारांनीही त्यानं मदत देखील केली होती. परंतु तरीही ते या आजारातून काही बरे होऊ शकले नाही आणि अखेर त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांनी आतापर्यंत ससुराल सिमर का, बरखा, जिनी और जुजू, कुछ रंग प्यार के ऐसें भी, मेरे अंगने मे यासारख्या मालिकांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर त्यांनी काही बॉलिवूड चित्रपटांमध्येदेखील काम केलं होतं.
लीना आचार्य
मेरी हानीकारक बिवी फेम टीव्ही अभिनेत्री लीना आचार्य यांचं दिल्लीत निधन झालं. लीना यांची किडनी निकामी झाल्यामुळे त्यांचं निधन झाले. बर्याच दिवसांपासून त्या या आजाराशी लढत होत्या. लीना आचार्य यांनी त्यांच्या कारकीर्दीत बर्याच टीव्ही शो आणि वेबसिरीजमध्ये काम केलं होतं. त्यांनी राणी मुखर्जी यांच्या सोबत हिचकी या सिनेमात देखील काम केलं होतं.
जगेश मुकाती
‘अमिता का अमित’ आणि ‘श्री गणेश’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते जगेश मुकाती यांचं १० जून रोजी निधन झालं. श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक त्यांना श्वासोच्छवासामध्ये अधिकच त्रास होऊ लागला आणि या समस्येमुळे त्यांचं रुग्णालयातच निधन झालं.
जरीना रोशन खान
प्रसिद्ध टीव्ही मालिका कुमकुम भाग्यच्या प्रसिद्ध आजीनेही २०२० मध्ये जगाला निरोप दिला. जरीना रोशन खान या ५४ वर्षांच्या होत्या. जरीना रोशन खान यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावरून शेअर करताना त्यांच्या सहकलाकार स्मृती झा यांच्यासह अन्य कलाकार देखील खूप भावूक झाले होते. याशिवाय त्यांनी ये रिश्ता क्या कहलाता है, विद्या या मालिकांमध्येही काम केलं होतं.
मनमित ग्रेवाल
टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल बऱ्याच दिवसांपासून काम न मिळाल्यामुळे नैराश्यात होता. यामुळे त्याने आत्महत्या केली. मनमीतने नवी मुंबईतील खारगर येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावला होता. मनमीतने गळफास घेतला तेव्हा त्याची पत्नी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. मनमित खोलीत गेला आणि आतून दरवाजा लॉक केला. खुर्चीचा आवाज बायकोने ऐकताच ती धावत खोलीकडे गेली आणि मनमीतला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यावेळी कोरोनाच्या भीतीने मनमीतच्या अंत्यसंस्कारांसाठी मदतीला कोणीही पुढे आले नाही.
रंजन सहगल
क्राइम पेट्रोल फेम रंजन सहगल यांचे एकाचवेळी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झालं. केवळ ३६ वर्षीय रंजन सहगल हे आजारपणाशी बराच काळ लढा देत होते. रंजन यांनी गुस्ताख दिल, रिश्ते से बड़ा प्यार, कुलदीपक आणि सावधान इंडिया या शोजमध्ये काम केलं होतं.