मंडळी २०२० हे वर्ष कोव्हीड आणि लॉकडाऊनमुळे गाजलं. या वर्षी अनेक गोष्टी घडणार होत्या पण या कोव्हीड काळात त्या पुढे ढकलल्या गेल्या. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे चित्रपट २०२० ऐवजी २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याचं ठरवलं. तर काही सेलिब्रिटींनी त्यांची लग्न पुढे ढकलली. खरंतर २०२० हे वर्ष संपता संपता अनेक सेलिब्रिटींनी दोनाचे चार हात केले सुद्धा! पण असो ज्यांनी नाही केले त्यांची वेळ यावर्षी येणार आहे. २०२१ मध्ये आपल्याला काही प्रसिद्ध जोड्या विवाह बंधनात अडकताना दिसण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहुयात कोणकोणत्या जोड्या आहेत ज्यांच्याबद्दल अशी शक्यता वर्तवली जातेय.
वरुण धवन – नताशा दलाल
वरुण धवन २०२१ मध्ये त्याच्या बालपणीची मैत्रीण नताशा हिच्याशी विवाहबद्ध होऊ शकतो. २०२० मध्ये हे लग्न धूमधडाक्यात होईल अशी अपेक्षा होती पण कोरोनामुळे या सगळ्यावर पाणी पडलं. परंतु हे दोघेही २०२१मध्ये नक्की लग्न करतील अशी अपेक्षा आहे.
अली फझल – ऋचा चड्ढा
ऋचा आणि अलीचेही एप्रिल २०२० मध्ये लग्न ठरलं होतं, परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे दोघांनी त्यांचं लग्न पुढे ढकललं. याशिवाय, अलीच्या आईचंही २०२० मध्ये निधन झालं ज्यामुळे दोघांचं लग्न झालंच नाही. अशा चर्चा आहेत की दोघेही २०२१ मध्ये लग्न करतील. एका मुलाखतीत रिचाने म्हटलं होतं की कोरोनाची लस येईपर्यंत ती आणि अली लग्न करणार नाहीत. यावर्षी करोना लसीच्या ड्राय रन्स सध्या सुरू आहेत. त्यामुळे या दोघांचंही लग्न याच वर्षी होण्याची दाट शक्यता आहे.
सुश्मिता सेन – रोहमन शॉल
सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच मिस वर्ल्ड राहिलेली सुश्मिता सेन गेल्या दोन वर्षांपासून रोहमन शॉलला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि यावर्षी त्यांच्या लग्नाची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नुकतेच रोहमन आणि सुष्मिता परिवारासह दुबईला नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी गेले होते जिथे सुष्मिताची मेव्हणी एक व्हिडिओमध्ये रोहमनला जिजू म्हणून हाक मारताना दिसली. रोहमन हा सुष्मितापेक्षा तब्बल १५ वर्षांनी लहान आहे. तर सुश्मिता सध्या ४५ वर्षांची आहे.
रणबीर कपूर – आलीया भट्ट
जेव्हा हे दोघेही आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी रणथंभोरला गेले तेव्हाच नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांना पेव फुटला. ते दोघेही फक्त रणथंभोरला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. परंतु अशी दाट शक्यता आहे की रणबीर-आलिया २०२१ मध्ये लग्न करतील आणि त्यांचं नातं आणखीन घट्ट करतील. तसंही रणबीर कपूरने एका मुलाखतीत याबद्दल सूचित केलं होतं. त्याने म्हटले होते की कोरोना आला नसता तर २०२० मध्ये त्याने आलियाशी लग्न केलं असतं. आता लवकरच त्यांच्या घरी लगीन घाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अर्जुन कपूर – मलायका अरोरा
अर्जुन आणि मलायका जवळपास दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. यावेळी, त्यांच्या लग्नाच्या अफवा बर्याच वेळा ऐकल्या गेल्या होत्या. परंतु २०२१मध्ये हे दोघे लग्न करू शकतात अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यांनी २०२० मधील संपूर्ण वेळ लॉकडाऊनमध्ये एकत्र घालविला आणि दोघेही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गोव्यात गेले होते.
आता यापैकी किती जोड्या खरंच यावर्षी विवाहबद्ध होतात की पुन्हा लग्न पुढील वर्षामध्ये ढकलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.










