Monday, July 1, 2024

उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’

भारतामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. मात्र, कोकणातील गणेश उत्सवाची सर कदाचित कशालाही नाही. अनेक चाकरमानी गणेश उत्सवासाठी कोकणाकडे धाव घेतात. बाप्पावर असलेली श्रद्धा आणि कोकणातील रीती तसेच तेथील वातावरण मनाला शांत करणारे आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकण निळ्या भोर पाण्याने आणि हिरवळीने इतकं बहरलेलं आहे की, गणेश उत्सव आल्यावर आपोआपच पाऊले कोकणाच्या दिशेने पडतात. अशात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर देखील दरवर्षी कोकणामध्ये गणेशउत्सव साजरा करते.

कोरोना महामारीमधून टाळेबंदीला थोडी शिथिलता मिळाली असली, तरी अद्याप सर्व काही सुरळीत झालेले नाही. अशात अनेक व्यक्ती एवढ्या दिवसांपासून रखडलेल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे काहींना यंदा कोकणाची वारी करता आली नाही. अशात उर्मिलाला देखील गणेश उत्सवासाठी कोकणात जाता आले नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपला अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली की, “आम्ही मुंबईमधील आमच्या घरी गणेश उत्सव साजरा करू शकत नाही. दरवर्षी आम्ही कोकणातील आमच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करतो. यंदा माझ्या कामांमुळे मला कोकणात जाता आले नाही.”

पुढे कोकणामधील निसर्गाचे वर्णन करत ती म्हणाली की, “कोकणामध्ये मुंबईप्रमाणे गाजावाजा नसतो. तिथे सर्वजण शांत पद्धतीने आणि विशेष म्हणजे लोककलेचा आनंद घेत बाप्पाची सेवा करत असतात. तसेच कोकणामध्ये खूप स्वच्छता असते. प्रदूषण होणार नाही या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते. खळखळ वाहणारे पाणी आणि नयनरम्य अशी हिरवळ या सर्वांच्या सानिध्यात बाप्पाचे आगमन जल्लोषात होते.”

गणेश उत्सवामध्ये बाप्पाच्या आणि सर्वांच्या आवडीच्या मोदकांविषयी बोलताना ती म्हणाली की, “बाप्पाच्या आगमनाने वातावरण प्रसन्न झालेले असते. तसेच प्रसादामध्ये असलेले कोकणातील मोदक फार चविष्ट असतात. तेथील निसर्गरम्य वातावरणामुळे ताज्या नारळांपासून बनवलेले मोदक मला खायला मिळतात.” मुलाखतीच्या शेवटी “बाप्पा मोरया आपल्या सृष्टीवरील सर्व दुःख दूर करेल,” अशी प्रार्थना देखील तिने गणपती बाप्पाकडे केली.

अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये ती मोठ्या साजशृंगारात बाप्पाचे दर्शन घेताना दिसत होती. श्रद्धेने बाप्पाची सेवा करत असतानाचे तिचे फोटो या व्हिडिओमध्ये टाकण्यात आलेत. तसेच या फोटोंवर मागे गणरायाचे एक सुंदर गाणे सुरू आहे.

तिने साल १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कर्म’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. उर्मिलाने तिच्या कारकिर्दीमध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम अशा भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच ‘रंगीला’ या चित्रपटामधून ती प्रकाशझोतात आली. साल २०१६ मध्ये कश्मीरी व्यावसायिक मोहसिन अख्तरबरोबर तिने विवाह केला. सध्या चित्रपटांपासून तिने रजा घेतली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

-सूरज पांचोलीला दिलासा, जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली

हे देखील वाचा