अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या झिशान कादरीवर मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा निर्माता जतीन सेठी यांनी दाखल केला असून अंबोली पोलीस लवकरच झिशान याना चौकशीसाठी बोलावणार असल्याचं माध्यमांकडून समजतंय.
गॅंग्ज ऑफ वासेपूर या सिनेमाचे लेखक आणि अभिनेता झिशान कादरी यांच्यावर अंबोली पोलीस ठाण्यात कलम ४२० अंतर्गत दीड कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिनेनिर्माते जतीन सेठी यांनी कादरी यांच्यावर त्यांच्यासोबत दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जतीन सेठी यांनी कादरी यांना एक वेबसिरीज साठी दिलेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जतीन यांचा आरोप आहे की त्यांची कंपनी ‘नाद फिल्म्स’ आणि झिशान कादरी यांची कंपनी ‘फ्रायडे टू फ्रायडे’ यांच्यात एक वेबसिरीजसाठी करार करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना जतीन यांनी दीड कोटी दिले होते. परंतु करार केल्यानंतरही झिशान कादरी यांनी ते पैसे वेबसिरीजमध्ये गुंतवले नाहीत. जतीन सेठी यांच्या म्हणण्यानुसार झिशान कादरी यांच्या कंपनीत प्रियांका बसी सुद्धा सहभागी आहेत. परंतु या गुन्ह्यात फक्त झिशान कादरी याचंच नाव आहे. प्रियांका बसी फक्त कादरी यांच्या प्रोडक्शनमध्ये त्यांच्यासोबत काम करतात.
जतीन यांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळे वेबसिरीजवर काम होणं बंद पडलं. हेच पैसे कादरी यांनी दुसऱ्या ठिकाणी वापरले. जतीन याना वेळेवर पैसे परत केले गेले नाहीत. शिवाय कादरी यांनी जतीन याना दिलेले चेक सुद्धा बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्राथमिक तपासानंतर पोलीस कादरी यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत.
झिशान कादरी हे बॉलिवूड मधील एक यशस्वी लेखक,दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. गॅंग्ज ऑफ वासेपुर या सिनेमाचं त्यांनी लेखन तर केलंच होतं परंतु दुसऱ्या भागात त्यांनी ‘डेफिनेट’ हे पात्र देखील साकारलं होतं ज्याची खूप चर्चा देखील बी टाऊन मध्ये झाली होती. याशिवाय त्यांनी स्वतः लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘मेराठीया गँगस्टर्स’ हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर खूप चालला. यानंतर त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छलाँग सिनेमाचं देखील लिखाण केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–शाब्बास रे पठ्ठ्या! काळजीपोटी दिलजीत दोसंजने केली शेतकऱ्यांची मोठी मदत
–दुःखद ! ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास