Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड गोविंदा ‘ती’च्या प्रेमात वेडा झाला होता, परंतू आईपुढे एक शब्दही चालला नाही

गोविंदा ‘ती’च्या प्रेमात वेडा झाला होता, परंतू आईपुढे एक शब्दही चालला नाही

बॉलिवूड ही अशी खाण आहे जिथे आपल्याला न मागताही अगणित किस्से ऐकायला मिळतात. अनेकदा या सेलिब्रिटींच्या चित्रपटांपेक्षा त्यांचे हे रंजक किस्सेच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. सामान्य आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचं असं एक ना एक गुपित असतंच असतं. परंतु सेलिब्रिटींच्या बाबतीत तसं फारसं कमी होताना दिसतं. म्हणजे त्यांची गुपितं नसतात का तर नाही… गुपित असतात परंतु बऱ्याचदा माध्यमांसमोर ही गुपितं उघडकीस आल्याने त्यांचे रंजक किस्से होऊन जातात. बॉलिवूडचा एकेकाळचा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा अहुजा याच्या आयुष्यातील असाच एक महत्त्वपूर्ण पण रंजक किस्सा आहे. चला तर मंडळी पाहुयात हा किस्सा नेमका काय आहे.

नव्वदीच्या दशकातील सुपरस्टार गोविंदा अजूनही त्याची शानदार नृत्यशैली आणि सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांमुळे स्मरणात आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्याला अभिनेता गोविंदाशी संबंधित एक प्रसिद्ध किस्सा सांगणार आहोत. गोविंदा त्याच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री नीलमच्या एकतर्फी प्रेमात होता. गोविंदाला नीलम इतकी आवडली होती की त्याने त्याची होणारी पत्नी सुनीतासोबतचा साखरपुडा मोडला होता.

माध्यमांनुसार, गोविंदाने अभिनेत्री नीलमला निर्माते प्राणलाल मेहता यांच्या कार्यालयात पाहिलं होतं. असं म्हटलं जातं की त्यानंतरच गोविंदा अभिनेत्री नीलमच्या प्रेमात पडला. खुद्द गोविंदाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की तो नीलमकडे आकर्षित झाला होता. तो अनेकदा चित्रपटांच्या सेट्सवर तिच्या सोबत वेळ घालवण्यासाठी तिला विनोद सांगत बसायचा.

जेव्हा गोविंदाने नीलमच्या प्रेमात धुंद असताना सुनीता यांच्याशी ठरलेला साखरपुडा मोडायचा निर्णय घेतला तेव्हा आई निर्मला देवी यांनी मध्यस्ती केली आणि गोविंदाला सुनीतासोबत लग्न करण्याचा आदेश दिला. असं म्हणतात की गोविंदाने आपल्या आईची कोणतीच गोष्ट कधीही टाळली नाही आणि झालं देखील असंच!

इच्छा नसतानाही गोविंदाने १९८७ मध्ये सुनीताशी लग्न केलं. गोविंदा आणि नीलम यांचा पहिला चित्रपट १९८६ साली आलेला ‘इलझाम’ होता. यानंतर या जोडीने लव्ह८६, सिंदूर, बिल्लू बादशाह असे एकामागून एक हिट चित्रपट दिले आणि पुढचा बराच काळ हे जोडपं प्रेक्षकांचं आवडतं जोडपं देखील राहिलं. नीलमने २०११ साली अभिनेते समीर सोनी यांच्याशी लग्न केलं.

हे देखील वाचा