Wednesday, July 3, 2024

शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेतील कलाकरांना जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व खलनायकांना देखील आहे. खलनायकांमुळेच नायक आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती वाटणार नाही. सिनेमांमध्ये जर खलनायकच नसेल तर नायकाचे महत्वच राहणार नाही. बॉलिवूडमध्ये खलनायकाची खूप मोठी परंपरा दिसून येते. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी प्रभावीपणे अतिशय क्रूर, निर्दयी खलनायक पडद्यावर रंगवला आहे. चित्रपटातील खलनायकी भूमिकांमुळे कलाकरांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही अनेकदा लोकांच्या तिरकस नजरांचा सामना करावा लागला.

सिनेमांमध्ये खलनायक रंगवणाऱ्या कलाकारांच्या यादीत अमरीश पुरी, प्राण, प्रेम चोप्रा, डॅनी, अमजद खान, जीवन, रणजित, प्रेमनाथ यांच्यासोबतच आशुतोष राणा, शाहरुख खान, प्रकाश राज, अजय देवगण, रणवीर सिंग या सर्वच कलाकारांनी खलनायकाच्या वेगवेगळ्या छटा पडद्यावर साकारल्या. खलनायक ही भूमिका किंवा या भूमिकेची ताकद पाहून मोठमोठ्या कलाकरांना या पात्राची भुरळ पडली आणि त्यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने हा खलनायक पडद्यावर रंगवला. नायक असणाऱ्या अनेक कलाकारांनीसुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांच्यातील अभिनयाची ताकद खलनायक साकारून सर्वांना दाखवली. मात्र सिनेसृष्टीमधे असे काही कलाकार ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त खलनायकीच भूमिका साकारल्या. अशा खलनायकाच्या यादीत एक नाव कधीही चुकवून चालणार नाही आणि ते म्हणजे गुलशन ग्रोव्हर. (gulshan grover)

गुलशन ग्रोव्हर यांनी त्यांच्या करियरमध्ये काही अपवाद वगळता फक्त आणि फक्त खलनायकच साकारला. त्यामुळेच त्यांना ‘बॅड मॅन’ ही ओळख मिळाली. याच बॅड मॅनने अतिशय क्रूर आणि संताप येणार व्हिलन प्रभावी पध्द्तीने चित्रपटांमध्ये निभावला आणि ‘खलनायक’ या भूमिकेला एक उंची मिळवून दिली. आज (२१ सप्टेंबर) गुलशन ग्रोव्हर त्यांचा ६६ वाढदिवस साजरा करत आहे. गुलशन ग्रोव्हर नाव जरी उच्चरले तरी डोळ्यासमोर येते चेहऱ्यावर कपटी हास्य, टोचणारी नजर, भारदस्त आवाज असणारे व्यक्तिमत्व. ही ओळख त्यांनी त्यांच्या भूमिकांमधूनच मिळवली आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक महिती.

गुलशन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९६६ रोजी दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. दिल्लीमधून शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी एका छोट्या नाट्य ग्रुपमध्ये प्रवेश घेतला. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्ये या ग्रुपच्या माध्यमातून काम केले. त्यानंतर त्यांचे नशीब त्यांना बॉलिवूडमध्ये घेऊन आले. गुलशन यांनी बॉलिवूडमध्ये तब्बल ४०० चित्रपटांमध्ये काम केले. फक्त हिंदी नाही तर हॉलीवुड, जर्मन, ऑस्ट्रेलियन, ईरानी, ब्रिटेन आदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. १९८० साली ‘हम पांच’ या सिनेमात भूमिका साकारत त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांचा चालू झालेला हा सिनेमांचा प्रवास आजतागायत अविरत सुरू आहे.

मात्र इथपर्यंत पोहचण्यासाठी गुलशन यांना प्रचंड संघर्ष आणि मेहनत करावी लागली. गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, “माझी दुपारची शाळा असायची. पण मी सकाळी लवकरच दप्तरात माझ्या शाळेचा गणवेश घेऊन निघायचे. मी अगदी रोजच सकाळी माझ्या घरापासून खूप दूर असणाऱ्या मोठ्या घरांमध्ये जाऊन भांडी आणि कपड्यांची पावडर विकायचो. डिटर्जेंट पावडरसोबत मी कधी कधी फिनाइलच्या गोळ्या, पुसणी हे सुद्धा विकले. हे सामान विकून पैसे कमवायचो. का तर माझ्या शाळेचा खर्च मीच करू शकेल. मी ज्या घरांमध्ये जाऊन सामान विकायचो तिथे राहणारे लोक माझ्याकडून सामान खरेदी करायचे. कारण त्यांनीसुद्धा मी शिकावे अशीच इच्छा असायची. माझ्या वडिलांनी नेहमीच आम्हाला मेहनत आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर चालण्याचा सल्ला दिला याचमुळे मी कधीच माझ्या गरिबीला त्रासलो नाही, घाबरलो नाही किंवा कंटाळलो नाही. ”

पुढे ते म्हणाले, “माझ्याकडे अनेकदा खाण्यासाठी पैसे नसायचे अनेक दिवस मला उपाशी रहावे लागायचे. मला माझ्या संघर्षाबद्दल किंवा जुन्या दिवसांबद्दल सांगायला कधीच वाईट किंवा लाज वाटली नाही. जेव्हा अभिनय करण्यासाठी मुंबईत आलो तेव्हा बऱ्याचदा मी उपाशी असायचो. पण मी माझे प्रयत्न कधी सोडले नाही.”

खलनायक होण्याचे त्यांनी का ठरवले या बद्दल एकदा त्यांनी सांगितले होते की, “जेव्हा मला जाणवले की, मला अभिनय करायचा आहे तेव्हा मी नायकाच्या भूमिकांच करणार हे मला माहित होते. मात्र जेव्हा मी मुंबईत आलो आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली तेव्हा मला जाणवले की मला खलनायक व्हायला आवडेल. याचे कारण खलनायकाला कोणते वय, लुक्स बांधून ठेवत नाही. तुम्ही कोणत्याही वयात खलनायक साकारू शकतात. वय आणि लुक्स या बाबी महत्वाच्या नसल्याने तुम्ही केवळ तुमच्या अभिनयाच्या जोरावर या भूमिकांना न्याय देऊ शकतात. खलनायक जरी क्रूर असला तरी प्रत्येक खलनायकाला एका वेगळे छटा असते, त्या वेगवेगळ्या छटा साकारण्याची संधी मला या भूमिकांनी दिली.”

गुलशन ग्रोव्हर यांना त्यांच्या ‘आय एम कलाम’ या सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. एका वेबसाइटनुसार गुलशन यांच्याकडे १३२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षनमध्ये त्यांच्या संपत्तीत सतत वाढ झाली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
खऱ्या आयुष्यातही गुलशन ग्रोवर यांना बायका मानायच्या व्हिलन, हवाई सुंदरीने दिलेला शेजारी बसण्यास नकार
अबब! चाळीशी पार केलेली करिना आहे इतक्या कोटींची मालकीण, लाखोंच्या बॅग्सची करते खरेदी

कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

हे देखील वाचा