बॉलिवूडमधील संगीत क्षेत्रात अनेकांनी आपल्या उत्तम कामगिरीने नाव कमावले आहे. पण गुलशन कुमार (Gulshan Kumar) हे संगीत क्षेत्रातील असे एक नाव आहे, ज्याला कोणी विसरण्याचा प्रयत्न जरी केला तरीही विसरू शकत नाही. संगीत क्षेत्रात त्यांच्या कार्याने त्यांनी उत्तुंग शिखर गाठले आहे. 5 मे या प्रसिद्ध संगीतकाराचा वाढदिवस आहे. गल्लीबोळातून ज्यूस विकण्यापासून ते एक प्रसिद्ध संगीतकार म्हणून नावारूपाला येणे काही सोप्पी गोष्टी नाहीये. तरीही त्यांनी हा खडतर प्रवास पूर्ण केला. जाणून घेऊया आज गुलशन कुमार यांच्या प्रवासाबद्दल…
गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे, 1951 रोजी दिल्लीमधील एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या वडिलांसोबत फळे देखील विकली आहेत. तसेच त्यांचे वडील दिल्लीमध्ये ज्यूस विकत होते. तिथेच गुलशन यांनी कॅसेट ऑडियो विकायला सुरुवात केली. त्यांनतर तिथून त्यांच्या करिअर मधील संघर्षाला सुरुवात झाली. त्यांनतर हळूहळू मेहनत करून ते बॉलिवूडमधील सर्वात मोठे चित्रपट निर्माते झाले. त्यांची म्युझिक कंपनी आज देशातील सर्वात मोठी संगीत निर्माण करणारी कंपनी आहे.
बॉलिवूडमधील संगीत क्षेत्रात त्यांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या या व्यवसायाला वाढवले आणि सुपर कॅसेट इंडस्ट्रीच्या नावाने त्यांची कंपनी सुरू केली. 1970 च्या दशकात चांगल्या क्वालिटीच्या कॅसेट बनवून त्यांनी त्यांचा व्यापार वाढवला. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईला रवाना झाले. गुलशन कुमार यांनी संगीत कंपनी सुपर कॅसेट इंडस्ट्रीसोबत टी-सीरिज संगीत लेबलची स्थापना केली.
दिनांक 12 ऑगस्ट, 1997 हा हिंदी म्युझिक इंडस्ट्रीसाठी एक काळा दिवस ठरला. याच दिवशी सकाळी साडे आठच्या सुमारास गुलशन कुमार मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांना गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. अंधेरी मधील जितेश्वर महादेवाच्या मंदिरा समोरून गुलशन कुमार यांना एका नंतर एक अशा 16 गोळ्या मारल्या होत्या. त्यांचा तिथे जागीच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूच्या एक तास आधी त्यांचे एका निर्मात्यासोबत फोनवर बोलणे झाले होते.
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, त्या दिवशी गुलशन कुमार हातात पूजेचे साहित्य घेऊन, माळ जपत मंदिराकडे चालले होते. गुलशन कुमार यांच्या घरापासून ते मंदिर एक किलोमीटरच्या अंतरापेक्षाही कमी होते. ते पूजा करून मंदिराच्या बाहेर निघत होते, तेव्हाच त्यांना पाठीमागून गोळी मारण्यात आली होती. त्यांनी एका व्यक्तीला हातात बंदूक घेऊन उभा राहिल्याचे देखील पाहिले होते.
गुलशन कुमार त्या व्यक्तीला काही म्हणतील त्याच्या आधीच त्या व्यक्तीने त्यांना एका नंतर एक अशा लागोपाठ 16 गोळ्या मारल्या. गुलशन कुमार यांच्या ड्रायव्हरने त्यांचा जीव वाचवण्यासाठी येऊन त्याच्या बंदुकीवर कलश फेकून मारला पण त्याने ड्रायव्हरच्या पायावर देखील गोळी मारली. त्या ड्रायवरचा देखील जागीच मृत्यू झाला होता.
गुलशन कुमार यांना तीन अपत्य आहेत. त्यात एक मुलगा भूषण कुमार, तर मुली खुशाली कुमार आणि तुलसी कुमार आहेत. सध्या टी- सीरिज भूषण कुमार सांभाळतात. दुसरीकडे तुलसी कुमार ही एक प्रसिद्ध गायिका आहे. खुशाली ही एक अभिनेत्री आणि फॅशन डिझायनर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…