Sunday, October 26, 2025
Home बॉलीवूड लाईमलाईटपासून दूर असणाऱ्या अक्षय खन्नासाठी आले होते करिष्मा कपूरचे स्थळ, पण…

लाईमलाईटपासून दूर असणाऱ्या अक्षय खन्नासाठी आले होते करिष्मा कपूरचे स्थळ, पण…

बॉलिवूडमध्ये काम करूनही काही मोजके कलाकार असे असतात, ज्यांना लाईमलाईटमध्ये राहणे कधीच आवडत नाही. आपण आणि आपले काम एवढ्याच दोन गोष्टी काही लोकांसाठी महत्त्वाच्या असतात. असाच काहीसा स्वभाव असणारा हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता आहे अक्षय खन्ना. अक्षयने त्याच्या करियरमध्ये अनेक एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट केले मात्र तरीही तो कधी जास्त प्रकाशझोतात आला नाही किंबहुना तो प्रकाशझोतात राहतच नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं अशा स्वभावाचा अक्षय खन्ना आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. २८ मार्च १९७५ साली मुंबईमध्ये अक्षयचा जन्म झाला.

सुपरस्टार विनोद खन्ना यांचा अक्षय खन्ना हा मुलगा आहे. बालपणापासूनच या ग्लॅमर इंडस्ट्रीला अगदी जवळून पाहिल्यामुळे अक्षयने देखील यातच करियर करण्याचे ठरवले. यासाठी त्याने मुंबईच्या किशोर नमित कपूर या इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरवले. वडील बॉलिवूडचे सुपरस्टार असल्याने अक्षयला घरातूनसुद्धा अभिनयाबद्दल माहिती मिळत होती. अक्षयने त्यांचे शिक्षण पूर्ण करून १९९७ साली आलेल्या ‘हिमालय पुत्र’ सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

मात्र, त्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. असे असले, तरीही या सिनेमामुळे त्याला स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. या अपयशाने खचून न जात अक्षयने पुन्हा जोमाने काम केले आणि त्याच वर्षी त्याने जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ सिनेमात त्याने काम केले. हा चित्रपट तुफान हिट झाला. यात अक्षयने साकारलेली सहाय्यक भूमिका देखील प्रेक्षकांना खूप भावली आणि अक्षयला इंडस्ट्रीसोबतच प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली.

बॉर्डर चित्रपटासाठी अक्षयला फिल्मफेअरचा पदार्पणचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अक्षयने ‘आ अब लौट चाले’, ‘मोहब्बत’, ‘कुदरत’, ‘डोली सजाके राखना’ आदी काही फ्लॉप आणि काही हिट सिनेमांमध्ये काम केले. १९९९ साली अक्षय सुभाष घई यांच्या ‘ताल’ सिनेमात दिसला. हा सिनेमा सुपरहिट झाला. अक्षयच्या अभिनयासोबतच त्याचा अंदाज, चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. या चित्रपटाने अक्षयच्या करियरला एक वेगळे आणि चांगले वळण दिले.

पुढे दोन वर्ष अक्षय सिनेमातून गायब होता. म्हणतात ना मोठी उडी घेण्यासाठी दोन पावलं मागे जावे लागते. अगदी तसेच अक्षयच्या बाबतीत झाले. अक्षय १९९९ नंतर थेट २००१ मध्ये फरहान अख्तरच्या ‘दिल चाहता हैं’ मध्ये दिसला. या सिनेमाने प्रचंड यश मिळवले. आमिर, सैफ असे मोठे कलाकार असूनही अक्षय त्याच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडण्यात यशस्वी झाला. त्याने साकारलेला सिद्धार्थ सिन्हा हा भाव खाऊन गेला. या सिनेमासाठी अक्षयला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेयरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अक्षयने २००२ साली आलेल्या अब्बास-मस्तानच्या ‘हमराज’ या सिनेमात साकारलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याने त्याच्या अभिनयाने सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी आयफाचा पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने अनेक हिट, फ्लॉप सिनेमे दिले. अक्षयने त्याच्या करियरमध्ये ऍक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमँटिक, गंभीर आदी कोणत्याही एका भूमिकेत न अडकता सर्वप्रकारच्या भूमिका अगदी लीलया साकारल्या. म्हणूनच एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याची ओळख तयार झाली.

अक्षय २००७ साली आलेल्या ‘गांधी माय फादरमध्ये’ हिरालाल गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसला. हा सिनेमा जरी हिट झाला नसला, तरीही या सिनेमाचे आणि अक्षयच्या भूमिकेचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. अक्षयला या सिनेमासाठी ऑस्ट्रेलियाच्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अक्षयने मोजके सिनेमे केले असले, तरीही ते दर्जेदार आणि हटके होते. त्याने त्याच्या कारकीर्दीत माधुरी दीक्षितपासून ते ऐश्वर्या, सोनाली, प्रियांका, करीना आदी मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले.

अक्षय कधीही मीडियामध्ये इतर कोणत्याच बातम्यांसाठी चर्चेचा विषय बनला नाही. त्याच्या सिनेमांव्यतिरिक्त तो कधीच इंडस्ट्रीमध्ये दिसला नाही. अभिनेता असूनही तो कधीच लाईमलाईटमध्ये दिसत नाही त्याची हीच गोष्ट त्याला वेगळे बनवते. अक्षय खन्ना आज वयाच्या ४६ मध्ये असतानाही अविवाहित आहे. त्याच्या करियरमध्ये त्याच्या अफेयरच्या बातम्या कधीच आल्या नसल्या, तरीही त्याचा या संदर्भातला एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे.

असे सांगितले जाते की, चित्रपटविश्वातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कपूर घराण्यातल्या एका सदस्यासाठी अक्षय जावई म्हणून पसंत केला गेला होता. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुपरहिट अभिनेत्री करिष्मा कपूर होती. हो, करिष्माच्या वडिलांची म्हणजेच रणधीर कपूर यांची खूप इच्छा होती की, करिश्माचे लग्न अक्षय खन्नासोबत व्हावे. मात्र, करिष्माच्या आई बबिता यांना करिष्मा करियरच्या पीक पॉईंटला असताना लग्न करणे मान्य नसल्याने त्यांनी या नात्याला विरोध केला. पण असे झाले नसते, तर आज आज करिष्मा अक्षय खन्नाची बायको असती.

एका मुलाखतीमध्ये अक्षयला अजून अविवाहित असण्याबद्दल विचारले असता त्याने सांगितले होते की, “मी खूप चंचल आहे मी एका व्यक्तीसोबत काही काळ नक्कीच राहू शकतो पण संपूर्ण आयुष्य नाही राहू शकत. मला स्वतंत्र आणि एकटे राहायला खूप आवडते. त्यामुळे मला मी कधीच लग्न केले नाही याचा पश्चताप होत नाही. मी माझे आयुष्य खूप आनंदाने आणि सुखात व्यतीत करत आहे.”

इंडस्ट्रीमध्ये अक्षय आणि अनिल कपूर यांची मैत्री खूप प्रसिद्ध आहे. ‘ताल’ सिनेमात या दोघांनी एकत्र काम केले होते. एकदा या चित्रपटाच्या सेटवर अक्षयला यायला वेळ झाला होता. अनिल कपूर वेळेत सेटवर आले होते. मात्र, अक्षय आला नव्हता. तो आल्यावर त्याने उशिरा येण्याबद्दल कोणतेही खोटे कारण न देता सरळ सरळ मी उशिरा उठलो म्हणून वेळ झाला असे खरे कारण सांगितले. अनिल कपूर यांना अक्षयचा खरेपणा खूप आवडला तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. एका कार्यक्रमादरम्यान अनिल यांनी सांगितले होते की, ते अक्षयला खूप घाबरतात कारण अक्षय स्पष्ट बोलतो. जे मनात आहे तेच त्याच्या ओठांवर असते.

अक्षयने आतापर्यंत ४०/४२ सिनेमातच काम केले. मात्र, त्याचे काम आणि त्याचा अभिनय सर्वांच्या लक्षात आहे. वडील सुपरस्टार असल्याने अक्षयवर खूप दबाव होता. प्रेक्षकांचे अक्षयवर खूप लक्ष होते. मात्र, असे असूनही संघर्ष करत त्याने त्याच्या हिमतीवर आणि त्याच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान आणि नाव तयार केले.

अशा अतिशय दमदार आणि हुशार कलाकाराला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हैदराबादमधील तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या आलिशान बंगल्यात राहतो मेगा पावरस्टार राम चरण, एअरलाईन कंपनीचाही आहे मालक

हे देखील वाचा