आज ८ फेब्रुवारी सुप्रसिद्ध गझलसम्राट जगजीत सिंग यांची जयंती. आज गझल नाव जरी कोणी उच्चरले तरी, डोळ्यासमोर एकच चेहेरा आणि डोक्यात एकच नाव सर्वात आधी येते ते म्हणजे, जगजीत सिंग. गझल या गाण्याच्या प्रकाराला त्यांनी एक नवीन ओळख आणि एक नवी उंची मिळवून दिली. पद्मश्री आणि पद्मविभूषण या देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या जगजीत सिंग यांची आज ८० वी जयंती. ८ फेब्रुवारी १९४१ ला जगजीत यांचा राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात जन्म झाला. त्यांनी हिंदीसिनेसृष्टीत मोठ्या संघर्षाने स्वतःचे नाव आणि ओळख निर्माण केली. आज गायक आणि संगीतकार जगजित सिंह यांचा आज जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा.
जगजीत सिंग यांनी त्यांच्या करियरमध्ये एका पेक्षा एक अशा सुरेख गझल आणि गाण्यांना आवाज दिला. त्यांनी त्यांच्या आवाजाच्या जादुने रसिकांना मंत्रमुग्ध केले. १५० पेक्षा अधिक अल्बम, चित्रपटातील गाण्यांना आवाज आणि अनेक नज्म यांना आवाज त्या गीतांना अजरामर केले. त्यांनी पंजाबी, बंगाली, गुजराती, हिंदी आणि नेपाली भाषांमध्ये अनेक गाणी गायली.
जगजित सिंग यांना त्यांच्या वडिलांचा संगीत क्षेत्रात येण्यासाठी तीव्र विरोध होता. जगजित सिंग यांनी ब्युरोक्रॅट्स व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगजित यांना आपल्या कुटुंबीयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. या विरोधाला न जुमानता त्यांनी उस्ताद जमाल खान आणि पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडून गायनाचे प्रशिक्षण घेतले. जगजित सिंग यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. घरात वीज नसल्यामुळे त्यांना दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागायचा.
त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते जालंधरला आले. तेथील डीएवी कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी कुरूक्षेत्र विश्वविद्यालयामधून इतिहास विषयात पोस्ट ग्रॅजुएशन केले.
त्यानंतर ते संगीत क्षेत्रात काम करण्याच्या तीव्र इच्छेने १९६५ साली ते मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यानंतर जगजित सिंग यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अचडणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लग्न समारंभात गायला सुरुवात केली.
जगजीत सिंग आणि त्यांची पत्नी चित्रा यांची प्रेमकहाणी खूपच मजेदार होती. या दोघांची पहिली भेट १९६७ एका जाहिरातीतील गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान झाली. चित्रा यांनी जेव्हा पहिल्यांदा जगजीत यांचे गाणे ऐकले तेव्हा त्यांनी ‘जगजीत आणि माझा आवाज सोबत जमणार नाही’ असे सांगत त्यांच्यासोबत गाण्यास नकार दिला. संगीतकारांनी खूप समजवल्यानंतर त्यांनी ते गाणे रेकॉर्ड केले.
त्यानंतर या दोघांनी अनेक गाणी सोबत रेकॉर्ड केली. हळूहळू त्यांच्या मैत्री झाली आणि जगजीत चित्रांच्या प्रेमात पडले. मात्र चित्रा या आधीपासूनच विवाहित होत्या. त्यांना एक मुलगी देखील होती. त्यामुळे जगजीत त्यांच्या मनातील गोष्ट चित्रा यांना सांगू शकत नव्हते.
पण काहीच दिवसांनी चित्रा यांनी त्यांच्या पतीपासून देबू प्रसाद दत्ता यांच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर जगजीत यांनी चित्रा यांना मागणी घातली पण त्यांनी नकार दिला. मग जगजीत थेट देबू प्रसाद दत्ता यांच्याकडे पोहचले आणि ‘मी तुमच्या पत्नीसोबत लग्न करू इच्छितो’ असे सांगत त्यांना सर्व गोष्ट सांगितली.
त्यावेळी चित्रा देबू प्रसाद दत्ता यांच्या पत्नी नव्हत्या. मात्र तरीही देबू आणि चित्रा यांचे मैत्रीचे नाते टिकून होते. त्यामुळे देबू आणि जगजीत यांनी चित्रा यांना समजवल्यानंतर त्या लग्नाला तयार झाल्या, आणि त्यांनी १९६९ साली लग्न केले.
यासर्व घटनांमध्ये जगजीत यांचे गाणे चालूच होते. त्यांनी त्यांच्या गाण्यांनी प्रसिद्धी आणि ओळख मिळवायला सुरुवात केली होती. १९७६ साली त्यांनी आणि चित्रा यांनी मिळून ‘द अनफॉरगेटेबल’ हा अल्बम प्रदर्शित केला. या अल्बमला प्रचंड लोकप्रियता मिळाली, आणि जगजीत, चित्रा स्टार झाले.
त्यानंतर या दोघांनी मिळून अनेक कॉन्सर्ट केले. १९८० सालापर्यँत जगजीत सिंग गझलसम्राट बनले होते. त्यांनी अर्थ, प्रेमगीत, लीला, सरफरोश, तुम बिन, वीर जारा, जिस्म, जॉगर्स पार्क आदी असंख्य चित्रपटातील गाण्यांना त्यांच्या मधुर आवाजाने अमर केले. त्यांचे ‘अर्थ’ सिनेमातील तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो…’, ‘साथ साथ’ सिनेमातील ‘तुम को देखा तो ये ख़याल आया’ आदी गझल खूपच हिट झाल्या.
जगजित सिंग यांना विवेक सिंग हा एकुलता एक मुलगा होता. मात्र १९९० साली एका कार दुर्घटनेत वयाच्या २१ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी दुःखद घटना होती. मुलाला गमावल्याचा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी गाणे सोडण्याचा निर्णय घेतला मात्र लोकांच्या आग्रहाखातर त्यानी गाणी गायली. जगजित सिंग यांनी ‘ना चिठ्ठी ना कोई संदेश…’ ही गझल आपल्या मुलाच्या मृत्यूने दुःखी होऊन लिहिली होती.
त्यांच्या पत्नीने चित्रा यांना मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्यांच्यावर मुलाच्या मृत्यूचा एवढा मोठा परिणाम झाला, की त्यांनी गाणे गाणेच सोडून दिले. त्यांचा ‘समवन समव्हेअर’ हा शेवटचा अल्बम प्रदर्शित झाला. या अल्बममध्ये जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांनी एकत्र गाणी म्हटली होती.
अल्बमच्या विक्रीतून होणा-या नफ्यातील काही भाग गीतकारांना देण्याची पद्धत जगजित सिंग यांनी सुरु केली होती. सुरुवातीला गीतकाराला केवळ गाणं लिहून द्यायचे पैसे मिळत होते. अल्बमच्या विक्रीतून होणारा नफा त्यांना मिळत नव्हता. मात्र जगजित सिंग यांनी गीतकारांना नफा मिळवून देणे सुरु केले होते.
भारतात डिजिटल सीडी अल्बम लाँच करणारे जगजित सिंग पहिले संगीतकार होते. त्यांनी १९८७ साली ‘बियॉन्ड टाईम’ या नावाने पहिला डिजिटल सीडी अल्बम लाँच केला होता.
२३ सप्टेंबर २०११ साली जगजीत सिंग यांना ब्रेन हॅमरेज झाले. त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. काही दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर त्यांनी १० ऑक्टोबर २०११ ला या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर २०१४ साली भारत सरकारने त्यांच्या आठवणीत पोस्टाचे तिकीट काढले आहे.