Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा हॅप्पी बर्थडे ब्रह्मी! हजारांहून अधिक चित्रपटात अभिनय, कोट्यवधींची संपत्ती; वाचा काॅमेडीच्या महानायकाबाबत

हॅप्पी बर्थडे ब्रह्मी! हजारांहून अधिक चित्रपटात अभिनय, कोट्यवधींची संपत्ती; वाचा काॅमेडीच्या महानायकाबाबत

बॉलिवूडप्रमाणेच टॉलिवूड सिनेसृष्टीमध्येही एकापेक्षा एक मोठे स्टार्स आहेत. यांमध्ये चिरंजीवी, प्रभू देवा, अल्लू अर्जुन, महेश बाबू, प्रभास आणि धनुष यांसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. या अभिनेत्यांनी दाक्षिणात्यच नव्हे तर संपूर्ण भारताला आपल्या अभिनयाने वेड लावले आहे. त्यामुळेच चाहत्यांना दाक्षिणात्य चित्रपट खूप आवडतात. यामध्ये असा स्टार आहे, ज्यामुळे देखील चित्रपट जोरदार हिट होतात. त्याचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. तो एक अभिनेता आणि कॉमेडियन आहे. होय, तोच ज्याने आपल्या कलेने चाहत्यांना पोट धरून हसायला लावले. तो स्टार म्हणजेच ब्रह्मानंदम. ते आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने आज आपण त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

एम ए चे शिक्षण घेणारे कुटुंबातील एकमेव व्यक्ती

दाक्षिणात्य कॉमेडियन ब्रह्मानंदम यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये झाला होता. त्यांंनी लक्ष्मी यांच्याशी लग्न केले होते. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यांचे नाव राजा गौतम आणि सिद्धार्थ आहे. ‘कॉमेडी किंग’ नावाने ओळखले जाणारे ब्रह्मानंदम यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप चांगली नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात केवळ ते एकमेव व्यक्ती होते, ज्यांनी एम ए चे शिक्षण घेतले होते. परंतु त्यांचे भविष्य तेव्हाच उजाळले, जेव्हा तेलुगू सिनेसृष्टीतील बड्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी दिली.

१ हजारपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये केले काम

ब्रह्मानंदम यांनी आतापर्यंत १ हजारपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ही गोष्ट आतापर्यंत खूप कमी चाहत्यांना माहिती आहे. त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात १९८७मध्ये ‘अहा ना पेलांता’ मधून केली होती. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी पाच पुरस्कार मिळाले आहेत. यांमध्ये ‘नंदी पुरस्कार’, ‘दाक्षिणात्य फिल्मफेअर पुरस्कार’, ‘सिनेमा पुरस्कार’, ‘दाक्षिणात्य आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’, ‘हैदराबाद टाईम्स चित्रपट पुरस्कार’ यांचा समावेश आहे. ब्रह्मानंदम यांनी १९९० पासून २००५ पर्यंत आलेल्या जवळपास प्रत्येक सिनेमात काम केले आणि चाहत्यांना आपल्या हास्य अभिनयाने भरभरून हसवले.

ब्रह्मानंदम यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

कॉमेडियन आणि अभिनेता ब्रह्मानंदम यांच्या नावावर कोणत्याही जिवंत अभिनेत्याने सर्वाधिक वेळा स्क्रीन क्रेडिट म्हणजेच पडद्यावरील श्रेय घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट योगदान दिल्यामुळे त्यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते.

ब्रह्मानंदम यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “जर तुम्ही कॉमेडियन असाल, तर तुम्हाला एकदम सहज राहावे लागेल आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर नेहमी लक्ष ठेवावे लागेल. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही भूमिकेत विनोद करणे सोपे होईल.”

एका चित्रपटासाठी ब्रह्मानंदम घेतात ‘इतके’ रुपये

शुल्क आकारण्याच्या बाबतीत अभिनेता ब्रह्मानंदम यांनी बॉलिवूड सुपरस्टार्सनाही मागे टाकले आहे. ब्रह्मानंदम एका चित्रपटासाठी १ ते २ कोटी रुपये आकारतात. सोबतच २४ तासांत ते जवळपास ५ लाख रुपये कमावतात. इतकेच नाही, तर त्यांच्याकडे एकापेक्षा एक लग्झरी गाड्या आहेत. सोबतच त्यांचे आलिशान घरही आहे.

हे देखील वाचा