ग्लॅमर जगात आजच्या काळात पाहिले तर प्रतिभेपेक्षा इतर गोष्टींना कितीही नाही म्हटले तरी महत्व दिले जाते. यामुळेच कदाचित प्रतिभावान कलाकार मागे पडतात आणि त्यांना दुय्यम किंवा सहाय्यक भूमिकांवरच समाधान मानावे लागते. अशी अनेक उदाहरणं या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इंडस्ट्रीमधील लोकंच अनेकदा याविषयी बोलताना दिसतात, मात्र यावर पुढे कोणी काहीही करत नाही. असो, या विभागातील अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिभेने आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना, समीक्षकांना आणि निर्माता, दिग्दर्शकांना त्यांची दखल घ्यायला भाग पाडले.
या कलाकारांची भूमिका भलेही सहायक असली तरी मुख्य कलाकाराला झाकून टाकतील अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भूमिका निभावल्या. असाच एक प्रतिभासंपन्न अभिनेता म्हणजे रणवीर शौरी. रणवीरने त्याच्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर त्याने साकारलेल्या भूमिका अक्षरशः पडद्यावर जिवंत केल्या. मात्र रणवीर त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आला. आज रणवीर त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
रणवीरचा जन्म १८ ऑगस्ट १९७२ रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्याचे संपूर्ण बालपण जालंधरमधेच गेले. पुढे कामाच्या शोधात तो मुंबईत आला. येथे त्याला १९९७ मध्ये व्हीजे म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या करिअरला सुरुवात झाली. या दरम्यान, हळूहळू रणवीरचा ओढा चित्रपटांकडे व्हायला लागला. त्याला चित्रपटांमध्ये रस निर्माण झाल्याने त्याने चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
रणवीरने २००२ मध्ये शशीलाल नायर दिग्दर्शित ‘एक छोटी सी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटातील रणवीरचा अभिनय प्रेक्षकांना आवडला आणि त्याने पहिल्याच सिनेमातून लोकांवर त्याची छाप पडली. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. मात्र त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. अखेर २००७ उजाडले आणि या वर्षाने रणवीरचे नशीबच पालटले. २००७ साली प्रदर्शित झालेल्या मधुर भांडारकर यांच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’ चित्रपटातून त्याला एक अभिनेता म्हणून ओळख मिळाली. या सिनेमात रणवीर शौरीसोबत कुणाल खेमू, नीतू चंद्रा आणि कोंकणा सेन शर्मा आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला.
रणवीरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तो त्याच्या अभिनेत्री पूजा भट्टसोबतच्या अफेयरमुळे तुफान गाजला. तो आणि पूजा भट्ट बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र रणवीरला दारूचे मोठे व्यसन होते. त्याच्या या व्यसनाचा पूजाला खूप त्रास होण्यास सुरुवात झाली, यावरून त्यांच्यात खटके देखील उडायचे. एका रिपोर्टनुसार तो अनेक वेळा पूजा भट्टला मारहाणसुद्धा करायचा. एकदा तो नशेत घरी गेला आणि त्याने पूजावर हात उचलला तेव्हा तिने त्यांच्यातले नाते संपवले आणि रणवीर विरोधात तक्रार दाखल केली.
पुढे २००६ साली ‘मिक्स्ड डबल्स’ चित्रपटाच्या वेळी त्याची कोंकणासोबत ओळख झाली आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. या दोघांनी त्याचे नाते मीडियापासून खूप लांब ठेवले. त्यांनी अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या साखरपुढ्याची बातमी सर्वांना देत सुखद धक्का दिला. पुढे २०१० साली त्यांनी खासगी कार्यक्रमात त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर एक महिन्यांनेच कोंकणा प्रेग्नेंट असल्याचे समोर आले तेव्हा ती लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचे सर्वांनां समजले. तिने एका मुलाला जन्म दिला. पण दुर्दैवाने २०१५ साली त्यांनी वेगळे होण्याचे ठरवत घटस्फोट घेतला. मात्र मुलगा ‘हारून’ची जबाबदारी हे दोघे मिळून उचलतात. आजही ते एकमेकांचे चांगले मित्र आहे.
रणवीरच्या महत्वाच्या चित्रपटांमध्ये ‘जिस्म’, ‘लक्ष्य’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘भेजा फ्राय’, ‘नो स्मोकिंग’, ‘आजा नच ले’, ‘सिंग इज किंग’, ‘फॅशन’, ‘चांदनी चौक टू चायना’, ‘एक था टायगर’, ‘बाजाते रहो’, ‘टिटली’, ‘सोनचिरिया’, ‘इंग्लिश मीडियम’, ‘लुटकेस’ आदींचा समावेश आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो ‘रंगबाज’ आणि ‘सीक्रेट गेम’ या वेब सीरीजमध्ये देखील झळकला. शिवाय रणवीरने छोट्या पडद्यावर ‘विनय और कौन’, ‘झलक दिखला जा 7’ आदी शो होस्ट केले आहेत.
हेही नक्की वाचा-
–खरंच की काय! जेह देखील आहे ‘लाल सिंग चड्ढा’च्या रोमँटिक गाण्याचा भाग? करीनाने केला खुलासा