बॉलिवूड आणि ब्रिटिश चित्रपटांत काम केलेली अभिनेत्री हेजल कीच 28 फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा करत आहे. हेजलचे खरे नाव गुरबसंत कौर आहे. परंतु, लग्नानंतर तिने आपले नाव बदलले. हेजलचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंगशी लग्न झाले आहे. हेजल आणि युवराज सिंगची प्रेमकथा खूपच रंजक आहे. आज हेजलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची प्रेमकथा जाणून घेऊयात.
मुली तर युवराजचा खेळ आणि त्याच्या दिसण्यावर फिदाच होत्या. पण, हेजलला प्रभावित करणे युवराजसाठी सोपे काम नव्हते. तीन वर्ष युवराजने हेजलला कॉफीवर नेण्यासाठी प्रयत्न करत होता. जेव्हा जेव्हा युवराज हेजलला कॉफीसाठी विचारायचा, तेव्हा ती लगेचच हो म्हणायची. पण ज्या दिवशी कॉफीसाठी जायचं ठरायचं, तेव्हा तिचा फोन बंद असायचा. हेजलने बर्याच वेळा असे केले. वारंवार असे घडल्यामुळे युवराज खूप रागावला आणि त्याने हेजलचा नंबर डिलीट केला.
युवराजने तिचा नंबर तर डिलीट केला, परंतु तो हेजलला त्याच्या हृदयातून काढून टाकू शकला नाही. अशा परिस्थितीत, त्याने हेजलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि सोशल मीडियावर हेजलशी मैत्री करण्यास तो यशस्वी झाला. तथापि, येथे देखील त्याला लगेच यश मिळाले नाही. युवराजने एका मुलाखतीत सांगितले होते की, तीन महिन्यांनंतर हेजलने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती. त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले. मग काही कॉमन मित्रांमुळे त्यांची पहिली डेट फिक्स झाली.
जवळजवळ तीन वर्षांनंतर युवराज आणि हेजलची कॉफी डेटवर भेट झाली. याबद्दल बोलताना हेजल कीच म्हणाली होती, “सतत भेट घेतल्यानंतरही मला कळले नाही, की मला युवराज आवडत आहे. जेव्हा युवराजने मला प्रपोज केले तेव्हा मला हे कळाले. मग काय, मी युवराजचा प्रस्ताव मान्य केला.” अशा प्रकारे या दोघांच्या नात्याला दिशा मिळाली. यानंतर हेजलने 30 नोव्हेंबर 2016 रोजी युवराज सिंगसोबत लग्न केले.
हेजलच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने बॉलिवूडमध्ये ‘बिल्ला’ आणि ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात काम केले आहे. ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात हेजल सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती ‘बिग बॉस 7’ चा भागही होती. हेजल ब्रिटिश चित्रपटांचा देखील भाग राहिली आहे. आजकाल हेजल युवराजसोबत तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत असते.