Monday, September 25, 2023

“लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून …” परखड मतं मांडणाऱ्या हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी नेहमीच त्याची मतं अतिशय परखडपणे कोणालाही न घाबरता मांडत असते. अभिनयात प्रभावी असणारी हेमांगी मतं मांडण्यात देखील अग्रेसर आहे. सोशल मीडियावरही तिचा वावर चांगलाच आहे. तिच्या पोस्टमुळे देखील ती कमालीची गाजत असते. आता देखील हेमांगी तिच्या या हटके पोस्टमुळे प्रकाशझोतात आली आहे.

हेमांगीने नुकताच तिचा एक ब्लॅक अँड व्हाइट फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो आणि या फोटोसोबत तिने लिहिलेली एक पोस्ट खूपच गाजत आहे. हेमांगीने या पोस्टमध्ये लिहिले, “हा आमचा Family photo!
माझे आई, बाबा, भाऊ, बहीण आणि मी!
पण तुम्हांला यात चारच माणसं दिसताएत ना! अंहं, मी धरून पाच आहेत! मी खरंच आहे या photo त.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

लहान असताना आपण सगळ्यांनीच आपल्या आई- बाबांच्या लग्नात आपण का नव्हतो किंवा मी कुठे होतो/होते photo काढताना असे लाज आणणारे प्रश्न चार चौघात विचारून आपल्या घरच्यांना हैराण केलेलं आहे. पुर्वी घरात आलेल्या पाहुण्यांना, नातेवाईकांना आपले photos/ album दाखवायची पद्धत बहुतांश घरात होती. आता हे ऐकताना odd वाटत असलं तरी ही पद्धत किंवा सवय म्हणूया Social Media वर आपण अबाधित ठेवलीए! तेव्हा त्या चार लोकांसमोर आपल्या पालकांची ‘आता हे कसं समजावयचं?’ झालेली नाजूक परिस्थिती आपल्याला ‘कळायला’ लागल्यावर लक्षात येते आणि ते आठवून आताही हसायला येतं! आपल्या मोठ्या भावंडांनी आपण कसे रस्त्यावरच सापडलो आणि घरी घेऊन आलो किंवा बोहारणीकडून कसं एका साडीवर घेतलं असं सांगून त्रास दिलेला आहे!
मी पण या सगळ्याला अपवाद नाही. मी या फोटोत नसण्याचं कारण विचारल्यावर माझ्या दादा-ताईने प्रथेप्रमाणे वरचीच टेप लावली! तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं ना, माझी आई सांगते मी त्यादिवशी उपाशी राहीले होते! मग मी जेवावं म्हणून माझ्या आईने मला सांगितलं की मी तिच्या पोटात होते! हा फोटो काढत असताना ती चार महीन्याची गरोदर होती. आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी वेगळ्या जगात अस्तिवात होतो! आयला म्हणजे आपण सुद्धा आहोत की या फोटोत! केवढा तो आनंद! आता हे खरं होतं की खोटं माहीत नाही. पण माझ्या बालबुद्धीला पटेल अशी story सांगून माझ्या आईने मी त्यांचीच मुलगी आहे याची खात्री दिली आणि तु पण होतीस या photo मध्ये सांगून आपलेपणाची मुळं कायमची घट्ट पेरली! आपल्याला कुणीतरी धरून आहे प्रत्यक्ष अप्रत्क्षपणे ही Feeling किती कमाल असते नाई?
माझ्यासाठी हाच माझा Do Gubbare Moment आहे!

तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक क्षण असतील ना? किंवा एखादा फोटो? ”

हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या या पोस्टचे आणि सोबत असणाऱ्या फोटोचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी तिच्या लिखाणाचे आणि व्यक्त होण्याची पद्धत देखील स्तुत्य असल्याचे सांगितले. दरम्यान हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती नाटकांसोबतच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत झळकत आहे.

हे देखील वाचा