Wednesday, July 3, 2024

‘या’ चित्रपटांच्या शूटिंग सेटवरही लागली होती आग, काही आगीत दोन तर एका शोच्या सेटवरच्या आगीत ५० लोकांनी गमावला त्यांचा जीव

नुकतीच मुंबईतल्या गोरेगावच्या फिल्मसिटीमधील स्टुडिओला आग लागली. या स्टुडिओमध्ये जरी जीवितहानी झाली नसली तरी खूप वित्तहानी झाल्याचे समजत आहे. तिथे काम करणाऱ्या काही कामगारांना किरकोळ दुखापत झाली. ही आग जरी लवकर आटोक्यात आली असली, तरी चित्रपटाच्या सेटवर अशा काही भयंकर स्वरूपाच्या घटना झाल्या आहेत.

अशा काही घटनांमुळे निर्माते, दिग्दर्शक यांचे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र यात तिथे काम करणाऱ्या लहान मोठ्या कामगारांच्या जीवाला देखील धोका असतो. आज आम्ही या लेखातून तुम्हाला भूतकाळात झालेल्या अशाच काही घटनांबद्दल माहिती देणार आहोत.

राजा हरिश्चंद्र :

दादासाहेब फाळके यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला सिनेमा म्हणूनराजा हरिश्चंद्र ओळखला जातो. हा सिनेमा तयार झाल्यानंतर म्हणजे १९१७ साली चित्रपटाच्या शेवटच्या प्रिंटला आग लागली होती. जेव्हा ही प्रिंट एका तंबूतून दुसऱ्या तंबूत हलवण्यात येत होती तेव्हा ही घटना घडली. त्यानंतर फाळके यांनी हा सिनेमा पुन्हा चित्रित केला होता.

मदर इंडिया :

भारतीय चित्रपटांमधला सर्वात क्लासिक सिनेमा म्हणून ‘मदर इंडिया’ चित्रपट ओळखला जातो. या चित्रपटाच्या सेटवरही भीषण आग लागली होती. नर्गिस आणि सुनील दत्त शूटिंग करत असताना ही आग लागली. एका सीनमध्ये सुनील दत्त यांना आगमध्ये अडकलेल्या नर्गिस यांना वाचवायचे असते, मात्र ही आग त्यावेळी अचानक खूप भडकली आणि नर्गिस खरोखरच त्या आगीत अडकल्या. तेव्हा सुनील दत्त यांनीच त्यांना वाचवले होते.

ब्लॅक :

२००४ साली आलेल्या संजय लीला भंसाली यांच्या ब्लॅक सिनेमाच्या मुंबईतल्या सेटवर खूप मोठ्या स्वरूपाची आग लागली होती. यात काही कामगारांना किरकोळ जखम झाली मात्र भरपूर वित्तहानी झाली होती.

देवदास :

संजय लीला भंसाली यांच्या देवदास या चित्रपटाच्या सेटवरही आग लागली होती. या आगीत तर दोन कामगारांचा मृत्यू देखील झाला होता. भंसाली यांच्या हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या सेटवरही आग लागली होती.

दबंग २ :

२०१२ साली आलेल्या दबंग २ या सिनेमाच्या मेहबूब स्टुडिओमधल्या सेटला आग लागली होती. त्यावेळी सलमान खान सेटवर शूटिंग करत होती. रिपोर्ट्सनुसार या सेटवर शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात सलमान सह तीन कामगार जखमी झाले होते.

मैं तेरा हिरो :

या सिनेमाच्या सेटला देखील आग लागली होती. बँकॉक मध्ये सुरु असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंग चालू होती. तिथे उभ्या असलेल्या व्हॅनिटी व्हॅनच्या एक जनरेटरला आग लागली आणि ही आग सेटपर्यँत पोहोचली. ह्या आगीमुळे सेटवर खूप धूर निर्माण झाला त्यामुळे अनेक कामगार बेशुद्ध देखील झाले होते.

एबीसीडी २ :

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या एबीसीडी २ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील सेटला आग लागली होती. या आगीत कलाकार आणि कामगारांसह ६०० माणसं अडकली होती. त्या सर्वांना या आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान :

या भव्य दिव्य मालिकेच्या सेटवरही भीषण आग लागली होती. द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान या मालिकेच्या सेटवरच्या या आगीत ५० लोकांनी त्यांचा जीव गमावला होता. या आगीत नीना गुप्ता देखील थोडक्यात वाचली होती.

हे देखील वाचा